कार्यक्रम पत्रिकेची पहिली प्रत आणि पहिल्या प्रतीचे साहित्यप्रेम...

■कोमसापच्या युवा साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेची पहिली प्रत रिक्षा चालकास देऊन सामान्य रसिकांचा सन्मान - रिक्षाचालकाचे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रपतींना पत्र...


ठाणे, प्रतिनिधी  : साहित्याचा प्रवाह अनेक वाटा-आडवाडा धुंडाळत कसा वाहता असतो, याचा अनुभव कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित युवा साहित्य संमेलनाच्या तयारीनिमित्ताने आला. ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात 11 व 12 जानेवारी, 2022 रोजी होणाऱ्या या संमेलनाच्या आयोजनाची तयारी सध्या आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयातील संमेलन केंद्रात सुरू आहे.


         कोमसापच्या युवाशक्ती प्रमुख प्रा. दीपा ठाणेकर यांना शनिवारी संमेलन केंद्रापर्यंतच्या रिक्षा प्रवासात अनपेक्षितपणे रिक्षाचालकाच्या साहित्यप्रेमाचा प्रत्यय आला. या प्रवासात झालेल्या संभाषणात रिक्षाचालकाने मराठी संतसाहित्य ते कविता, गझला यांचे अनेक दाखले देत आपल्या रसिकत्वाची प्रचिती दिली, आणि ठाणेनगरीत साजरे होणाऱ्या या संमेलनाच्या यशस्वितेची जणू खात्रीच दिली.


         झाले असे की, प्रा. दीपा ठाणेकर रिक्षातून संमेलन केंद्राकडे येताना एका दूरध्वनी संभाषणात त्या गझल-काव्यसंमेलनाच्या आयोजनाबद्दल चर्चा करत होत्या... तर रिक्षाचालकाने उत्सुकतेने प्रा. ठाणेकर यांना, "तुम्ही कविता-गझला लिहिता काय?," म्हणून विचारले. त्यावर प्रा. ठाणेकर यांनी रिक्षाचालकास संमेलनाची माहिती दिली. 


         इथून सुरू झालेल्या या शब्दगप्पांत रिक्षा चालकानेही आपल्याला साहित्य, विशेषत: गझला आवडत असल्याचे सांगत वारकरी संप्रदायातील अभंग-ओव्यांपासून ते अगदी जॉन एलिया आदी गझलकारांच्या रचना म्हणायला सुरुवात केली. अधेमधे रिक्षाचालक ज्ञानेश्वरीतल्या श्लोकांचेही दाखले देऊ लागला... तोवर रिक्षा संमेलन केंद्रापर्यंत कधी आली, हे प्रा. ठाणेकर यांच्याही ध्यानात आले नाही! साहित्याचा प्रवाह जनमानसातला ओलावा टिकवून ठेवणारा आहे, याचाच प्रत्यय देणारा हा प्रसंग!


         कविवर्य नारायण सुर्वेमास्तरांनी म्हटले होतेच, 'रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे, याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे, इथूनच शब्दांच्या हाती फुले ठेवीत आहे, इथूनच शब्दांच्या हाती खड्गे मी देत आहे..." त्या शब्दांना जागणारे अनेक जण आपल्या भोवताली असतात, आहेत. त्यांपैकी एकाची भेट आज कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनानिमित्ताने अनपेक्षितपणे झाली! ते साहित्यप्रेमी रिक्षाचालक आहेत... 


        विनायक सिनलकर! कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते संमेलन केंद्रात रिक्षाचालक विनायक सिनलकर यांना कार्यक्रमपत्रिकेची पहिली छापील प्रत देऊन त्यांच्या रसिकत्वाचा सन्मान करण्यात आला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी कोमसापने राष्ट्रपतींना पत्र लिहिण्याची मोहीम सुरू केली आहे, त्या मोहीमेत रिक्षाचालक सिनलकर यांनी पत्र लिहून सहभाग नोंदवला असून त्यांनी युवा साहित्य संमेलनाला प्रत्येक साहित्यप्रेमी ठाणेकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments