शहापूर मध्ये रिपाइंला खिंडार युवाध्यक्षासह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश


ठाणे (प्रतिनिधी) - शहापूर तालुक्यामध्ये रिपाइं (आठवले) ला खिंडार पडले आहे. रिपाइंचे युवाध्यक्ष मच्छिंद्र निकाळे यांच्यासह शेकडो युवक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे नवी मुंबई युवाध्यक्ष अन्नू आंग्रे आणि अरुण पाटील हे उपस्थित होते. 


        मच्छिंद्र निकाळे हे गेल्या अनेक वर्षांपासून रिपाइं आठवले गटात सक्रीय होते. आक्रमक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. मात्र, रिपाइं (आ.) ची भूमिका भाजपधार्जिणी झाली असल्याने आंबेडकरी समाजावर अन्याय होत आहे, असा आरोप करीत या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 


      या संदर्भात निकाळे यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांची भूमिका पहात आहे. त्यांच्याकडून पुरोगामी विचारांचाच पुरस्कार केला जात आहे. शिव, फुले, आंबेडकरी विचारधारेवर ते काम करीत असल्यानेच कसारा, वाशाळा, शिरोळ पंचक्रोशीतील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यास आज मूर्त स्वरुप आले आहे.

Post a Comment

0 Comments