उल्हास नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी पावले उचला नदी काठा वरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सूचना


कल्याण , प्रतिनिधी  : उल्हास नदीच्या काठावर मोहने आणि म्हारळ येथील अतिक्रमणे हटविण्यासाठी तसेच नदीतील प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे जिल्हा परिषदेने मोहिम हाती घ्यावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी  दिल्या आहेत.


         उल्हास नदीच्या काठावर मोहने आणि म्हारळ परिसरात अतिक्रमण आणि नदी पात्रात औद्योगिक आणि नागरी वसाहतीतील दूषित पाणी मिसळून प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून आल्या होत्या. त्याबाबत चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडली. 


         बैठकीस जलसंपदा सचिव बसवंत स्वामी, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी ( दूरदृश्यप्रणालीव्दारे ), ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (दूरदृश्यप्रणालीव्दारे) उपस्थित होते. 

 
       मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेच्या प्रशासनाने अतिक्रमण निश्चित करावी. अशा बांधकाम करणाऱ्या नागरिकांना नोटीस बजावण्यात यावी. ग्रामीण भागातील अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने कार्यवाही करण्यात यावी. 


      उल्हास नदीच्या पात्रातील गाळ काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने पुढाकार घ्यावा. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने मदत केली जाईल. नदीला मिळणाऱ्या नाल्यांवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावेत, अशा सूचना पाटील यांनी दिल्या. 


       एनआरसी कंपनीने या परिसरात उभारलेला बंधारा जीर्ण झाला असून त्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. त्यावर हा बंधारा संपादीत करुन घ्यावा आणि त्याची दुरुस्ती करण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात यावी, अशा सूचना  जयंत पाटील यांनी केली.


      यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली, मी कल्याणकार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक  नितीन निकम, उमेष  बोरगावकर, कैलास शिंदे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजय टाटू, पर्यावरण विभागाचे उपसचिव अभय पिंपरकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसचिव पी. के. मिराशे, ठाणे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, अधीक्षक अभियंता राजेश सोनटक्के, शहर अभियंता सपना कोळी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments