अदानीच्या सुरक्षा रक्षकां कडून फेरीवाल्यांवर कारवाई कारवाईचा व्हिडीओ सोशल मिडिया व्हायरल

■तर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांना बाजूला केल्याचे अदानी सूत्रांची माहिती...

  

कल्याण , कुणाल म्हात्रे :  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे "अ" प्रभाग क्षेत्रातील फेरीवाला हटाओ पथक निकामी ठरल्याचे मोहने येथे दिसून येत असून अदानी समूहाच्या सुरक्षा रक्षकांनी सायंकाळच्या सुमारास फेरीवाल्यांना हटविण्यास सुरुवात केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल झाल्याने पालिकेने खाजगी सुरक्षा यंत्रणेचा सिक्युरिटीचा आसरा घेतला की काय याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे. तर कंपनीच्या गेट समोर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांना बाजूला होण्यास सांगितले असल्याची माहिती अदानी समूहाच्या सूत्रांची दिली आहे.


बॉर्डर वर तैनात असलेल्या जवानासारखा पोशाख परिधान करीत ओपन जीप मध्ये हे सात ते आठ अदानी समूहाच्या ताफ्यातील हे सुरक्षा रक्षक एन.आर.सी गेट बाहेर भरत असलेल्या मार्केटमध्ये प्रवेश करून फेरीवाल्यांना हटविण्याचे काम करू लागले. कारखान्याच्या बाहेर रस्त्याच्या कडेला भाजीविक्रेते व इतर फेरीवाले आपला व्यवसाय करीत आहेत. अदानी समूहाच्या जागेच्या संरक्षणासाठी असलेले हे गार्ड मात्र भलतीच दादागिरी करून फेरीवाल्यांना हटविण्याचे काम करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे "अ" प्रभागात स्वतंत्र्यपणे फेरीवाला हटाओ पथक असून ते झोपी गेल्याचे दिसून येत असल्याने या सुरक्षा रक्षकांनी मात्र मनपाची कमतरता भासू न देता फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उचलताना दिसून आले आहे. याबाबत शिवसेनेचे कार्यकर्ते मच्छिंद्र दवचे यांनी सुरक्षा रक्षक एन.आर.सी. गेटच्या बाहेर येऊन दादागिरी करीत असतील तर आम्ही ते खपवून घेणार नसल्याचे सांगत रोजगारासाठी भाजीविक्रेते गेल्या ५० वर्षांपासून उपजीविकेसाठी व्यवसाय करीत असल्याचे म्हटले आहे.


दरम्यान एन.आर.सी. कंपनीची मालकी अदानी समूहाकडे असून या कंपनीचे तोडकाम सुरु आहे. हे साहित्य बाहेर नेण्यासाठी ट्रक, डंपरची याठिकाणी वर्दळ असते. यामुळे ट्रकमधील सामान पडल्यास गंभीर इजा  होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कंपनीच्या गेट समोर जे फेरीवाले व्यवसाय करत आहेत त्यांना महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी बाजूला होण्यास सांगितले असल्याची माहिती अदानी समूहाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.  

Post a Comment

0 Comments