पालकांनी मुलांच्या पंखांना बळ देऊन त्यांना स्वकर्तुत्वाची संधी द्यावी - आयुक्त दिलीप ढोले


कल्याण, प्रतिनिधी  : अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती संचलित बांधिलकी वधुवर सुचक मंडळ कल्याण यांच्या वतीने  नुकताच वधू-वर पालक परिचय मेळावा अभिनव विद्यामंदिर पारनाका कल्याण येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले हे  बोलत होते.


पालकांना असे वाटते आपण आपल्या मुलासाठी स्वतःचे घरगाडी ,शेती  वगैरे घेऊन ठेवावी म्हणजे आपण आपल्या मुलासाठी काहीतरी केले असे वाटेल. पण आपला मुलगा अगर मुलगी यांना विवाहापूर्वी घरगाडीबंगला,  शेती वगेरे मालमत्ता आयती दिली तर मुलं आळशी होतील. त्यांना करण्यासाठी काहीच शिल्लक राहणार नाही,  त्यांना त्यांच्या हिमतीवर त्यांच्या कर्तृत्वावर चांगली नोकरी स्वतःचे चांगले घरगाडी,शेती इतर सुख सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करण्याची कष्ट करण्याची संधी द्यावी त्यामुळे ते आपल्या स्वकर्तुत्वाने या सर्व सुख सुविधा मिळवतील.


 मुलींच्या पालकांनी सुद्धा आपल्या जावयाकडे आता काय आहे हे पाहण्या पेक्षा तो कर्तृत्ववान आहे ना आपल्या मुलीला सांभाळेल ना हे पाहावे.  या कार्यक्रमाकरिता नवीमुंबई महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले तसेच कल्याण सेल टॅक्सचे सहाय्यक आयुक्त छगन जायभाय व कल्याण आरटीओचे अधिकारी संजय फुंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 


बांधीलकी वधुवर सूचक मंडळाने  कोरोना काळात ६६ लग्न जमवून अनेक नव वधूवरांना लग्नाच्या बेडीत आडकवीण्यात सहकार्य केले आहेयाचेच पुढचे पाउल म्हणजे हा वधू वर सूचक परिचय मेळावा आयोजित केलेला होता असे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक यांनी सांगितले या मेळाव्या करिता दीडशे वधू-वर यांनी सहभाग नोंदवला होता यावेळी वधू-वरांनी आपला परिचय देऊन आपला जोडीदार कसा असावा याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्ती घुगे यांनी केले. तर समाज प्रबोधनपर मार्गदर्शन आत्माराम फड यांनी केले. समितीच्या विविध शाखांच्या कार्याचा आढावा प्रा.रामनाथ दौंड यांनी घेतला.


अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड यांनी उपस्थित समाजबांधवांना हुंडा न घेता विवाह करण्याबाबत आवाहन केले. तसेच कार्यक्रमासाठी  ज्या समाज बांधवांनी आर्थिक सहकार्य केले त्यांचा विशेष सन्मान यावेळी   करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता करिता रामनाथ दौंड, संपत गीते, लता पालवे, वंदना सानप, किरण दराडे अनिल दौंड, सिमरन दराडेयांनी विशेष परिश्रम घेतले. 


असेच वधू वर मिळावे महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात घेण्याचा मानस वधू वर सूचक मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती घुगे यांनी व्यक्त केलाकोणतेही नोदणी शुल्क न आकारता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुमासदार शैलीत प्रणव भांबुरे यांनी आणि सिमरन दराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संग्राम घुगे यांनी केले.

Post a Comment

0 Comments