व्हिक्टरीची उपांत्य फेरीत धडक


ठाणे, प्रतिनिधी : - व्हिक्टरी क्रिकेट क्लबने सलग तिसरा विजय मिळवत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित अर्जुन मढवी स्मृती महिला टी २० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. सेन्ट्रल मैदानावर खेळलेल्या शेवटच्या साखळी लढतीत कर्णधार शर्वि सावेच्याअष्टपैलू खेळामुळे व्हिक्टरी क्रिकेट क्लबने यजमान दैवेज्ञ क्रिकेट क्लबचा ४३ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीतले आपले स्थान निश्चित केले. 


         साखळी लढतीतील तिसऱ्या सामन्यात खेळताना दैवेज्ञ क्रिकेट क्लबने आधीच्या सामन्यांच्या तुलनेत आपली कामगिरी खूपच उंचावली. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात ताळमेळ राखत दैवेज्ञ क्रिकेट क्लबने व्हिक्टरी क्रिकेट क्लबला २० षटकात ६ बाद १२० धावांवर रोखले होते. शर्विने तीन चौकारासह २२ आणि सृष्टी कुडाळकरने नाबाद २३ धाव करत संघाला शतकीपार धावसंख्या उभारून दिली. महेक पोकरने उपयुक्त अशा १३ धावा केल्या.साक्षी कोंडे आणि आरती यादवने प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. जान्हवी वाडकर, तितिक्षा मौर्याने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. 


        या आव्हानाला सामोरे जाताना दैवेज्ञ क्रिकेट क्लबला २० षटकात ८ बाद ७८ धावा करता आल्या. त्याच्या रिया पटेलने १६ आणि दिशा मोटाने १४ धावा केल्या. संघाला उपांत्य फेरीचा दरवाजा उघडून देताना झील डिमेलो, ईश्वरी गायकवाड आणि सृष्टी शिंदेने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. एक विकेट मिळवुन गोलंदाजीतही चमक दाखवताना शर्वीने एक विकेट मिळवली. शर्वीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार दिला.


      अन्य लढतीत पय्याडे स्पोर्ट्स क्लबने डॅशिंग क्रिकेट क्लबला ५० धावांनी मत देत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या, प्रथम फलंदाजी करताना पय्याडे स्पोर्ट्स क्लबने २० षटकात १२४ धावा उभारल्या.कृतिका यादवने ४३ आणि विधी मथारियाने ३३ धावा केल्या.प्रत्युत्तरादाखल डॅशिंग क्रिकेट क्लबचा डाव १७.५ षटकात ७४ धावांवर गडगडला. डॅशिंग क्रिकेट क्लबच्या फलंदाजीला खिंडार पाडताना अक्षरा पिल्लईने १३ धावांत पाच विकेट्स मिळवल्या.


संक्षिप्त धावफलक -

व्हिक्टरी क्रिकेट क्लब - २० षटकात ६ बाद १२० ( शर्वी सावे २२, सृष्टी कुडाळकर नाबाद २३, महेक पोकर १३, साक्षी कोंडे ४-२०-२, आरती यादव ४-२३-२ ) विजयी विरुद्ध दैवेज्ञ क्रिकेट क्लब - २० षटकात ८ बाद ७८ ( रिया पटेल १६, दिशा मोटा १४, झील डिमेलो ४-११-२, ईश्वरी गायकवाड ४-१३-२ , सुरभी शिंदे ४-१५-२, शर्वी सावे ४-१३-१)पय्याडे स्पोर्ट्स क्लब - २० षटकात ४ बाद १२४ (कृतिका यादव ४३, विधी मथारिया ३३) विजयी विरुद्ध डॅशिंग क्रिकेट क्लब - १७.५ षटकात सर्वबाद ७४ (वेदिका आहेर १७, संयुक्ता किणी १३, अक्षरा पिल्लई ३.५ - १३-५ )

Post a Comment

0 Comments