अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका' या मासिकाच्या विशेषांकाचे स्थानीय प्रकाशन


कल्याण, प्रतिनिधी  : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महा अंनिस), ठाणे जिल्ह्याच्या वतीने संघटनेचे अधिकृत मुखपत्र 'अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका' या मासिकाच्या विशेषांकाचा स्थानीय प्रकाशन सोहळा कल्याण येथे आयोजित करण्यात आला. 


           या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञानवादी लेखक आणि विचारवंत जगदीश काबरे हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महा. अंनिस कल्याण शाखेच्या अध्यक्षा डॉ. सुषमा बसवंत होत्या. या कार्यक्रमास कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, खोपोली, मोहोने, घाटकोपर येथील अनेक कार्यकर्ते, वर्गणीदार आणि देणगीदार उपस्थित होते.   


        या कार्यक्रमाचे सूत्रधार विनोद म्हात्रे, विज्ञान बोध वाहिनी कार्यवाह, यांच्या चळवळ-गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक राजेश देवरुखकर, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय संतोष म्हात्रे, सचिव, भिवंडी शाखा, यांनी करून दिला. 


        या मासिकाचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड यांनी या मासिकाचा जन्म कसा झाला हे सांगताना, संघटनेवर आलेल्या संकटावर मात करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कार्यकर्त्यांनी आणि संपादक मंडळाच्या सदस्यांनी समर्पित भावनेने, एकजुटीने,  अत्यंत कठोर मेहनत करून अक्षरशः शून्यातून हे मासिक निर्माण केले याची माहिती दिली.

 

         या कार्यक्रमास उपस्थित 'समता संघर्ष'चे अध्यक्ष शैलेश दोंदे आणि उपाध्यक्ष सदानंद गायकवाड,  पु ल कट्ट्याचे सदस्य रंगकर्मी आणि अभिनेते सुधीर चित्ते, कल्याण शाखेचे उपाध्यक्ष डॉ. बी एस वाघ यांनी आपली मनोगते व्यक्त करून मासिकास तसेच महा अंनिसला शुभेच्छा दिल्या. जगदीश काबरे यांच्या लेखनाचे चाहते असल्याचे सांगून त्यांचे विचार ऐकण्याचा योग प्रथमच येत असल्याबदधल सर्वांनी आनंद व्यक्त केला. 


            प्रमुख पाहुणे, प्रसिद्ध विज्ञानवादी लेखक, विचारवंत जगदीश काबरे यांनी 'अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका' या मासिकास सदिच्छा देऊन वैज्ञानिक दृष्टीकोनाचा संस्कार अगदी लहान वयातच  पुढच्या पिढीतल्या मुलामुलींवर कसा रुजवला गेला पाहिजे याची माहिती दिली. 


             लहान मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देताना देवाने अमुक केले, देव असे करतो अशी उत्तरे न देता त्यांना कळेल अशा सोप्या शब्दात सत्य माहिती देऊन त्यांची बालसुलभ जिज्ञासा पूर्ण केली पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. जुन्या पिढीला बदलणे तसे अवघडच असल्याने येणार्‍या पिढ्यांमध्ये वैज्ञानिक, विवेकी विचार पेरून ते पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे आणि त्यासाठी प्रत्येक घराघरातून जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले पाहिजेत असे त्यांनी सांगितले.

 
        आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. सुषमा बसवंत यांनी जगदीश काबरे यांच्या विचारांशी सहम ति व्यक्त केली. तसेच कल्याण शाखेच्या कार्यकर्त्यांचे, मासिकाच्या संपादक मंडळाचे कौतुक केले आणि त्यांना सदिच्छा दिल्या.   
कल्याण शाखेचे सचिव तानाजी संपत सत्वधीर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कल्याण, डोंबिवली, भिवंडी शाखेतील कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाचे शेवटी देणगीदार आणि वर्गणीदारांना विशेषांक देण्यात आला.

Post a Comment

0 Comments