आणि दिसताच क्षणी मुलाला उचलून कडेवर घेतलं... मुख्याध्यापिका चंद्रकला काबूकर


कल्याण , प्रतिनिधी  : "दिसताच क्षणी हे मुल मला फार आवडलं. वीटभट्टी वर इतकी गोड मुलं पाहून माझं मलाच भान राहिलं नाही, आणि मी एका क्षणातच त्या मुलाला उचलून कडेवर घेतले." हे उद्गार आहेत जिल्हा परिषद शाळा कारिवलीच्या मुख्याध्यापिका चंद्रकला काबूकर यांचे. 


       डिसेंबर, जानेवारी महिना उजाडला की कारिवली गावाच्या आजूबाजूला वीटभट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात वीटभट्टीमजूर कामगार बाहेरील गावातून येतात. वीटभट्ट्यांवर ते काम करत असतात. हे मजूर येताना एकटेच न येता आपल्याबरोबर आपलं संपूर्ण कुटुंब, लहान मुलेही घेऊन येतात. अगदी शाळेत जाणारी मुलही शाळा बुडवून आणली जातात.


       त्यामुळे ज्या गावांमध्ये ती मुले शिकत असतात तिथलं शिक्षण थांबतं. अशा वेळी या मुलांचं शिक्षण थांबू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने वीटभट्टीवरील विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना जवळच्या शाळेमध्ये दाखल करावे, अशा पद्धतीचा एक नियमच तयार केलेला आहे. त्यामुळे दरवर्षी अशी हजारोमुलं जवळपासच्या शाळेत दाखल होतात. 

 
         त्याच नियमाच्याअनुषंगाने कारवली शाळेतील शरद जाधव, जयश्री कदम,  बाबासाहेब राऊत, अल्पना देशपांडे, प्रमिला राऊत हे शिक्षक मुख्याध्यापक चंद्रकला काबूकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा शोध घ्यायला गावाच्या बाजूला असलेल्या वीटभट्ट्यांवर पोहोचले. या शिक्षकांना तिथलं चित्र नेहमीचच पहायला मिळालं. 


        त्या ठिकाणी लहान लहान मुलं ऊन्हाताहनात बसून खेळत होती. झाडाला दोर बांधून झोके घेत होती. कुणी रडत होतं तर कुणी चिखलात माखलेलं होत. मोठी भावंडे लहान भावंडांना खेळवत होती. तर काही मुलं आपल्या आई-वडिलांना वीटभट्टीच्या कामात मदत करत होती.

 
         चंद्रकला काबूकर यांनी सर्व पालकांना एकत्र करून आपल्या मुलांना कारिवलीच्या शाळेत दाखल करा अशी विनंती केली. शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितले. पालकही तयार झाले. त्या वीटभट्टीवर फिरत असतांना एक अत्यंत गोंडास बालक काबूकर यांच्या नजरेस पडलं. 


         आणि आपण शिक्षक आहोत हे विसरुन आईच्या मायेनं, ममतेनं वात्सल्याने त्यांनी त्या गोंडस बाळाला उचलून कडेवर घेतले. त्याचे लाड केले. त्याला खाऊ दिला. शिक्षक हा नुसताच शिक्षक नसतो तर त्याच्यामध्ये एक आईही दडलेली असते. याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. " ते मुलं पाहताच मला फार आवडलं, आणि मी त्याला उचलून घेतलं.त्या क्षणी माझ्या मनात दुसरी कोणतीच भावना नव्हती असे त्यांनी सांगितले.

 
        दरवर्षी आमच्या गावाच्याबाजूला वीटभट्टीवर मजूर मुलांसह येतात. आम्ही त्याठिकाणी सर्वे करतो. तिथली मुलं आमच्या शाळेत दाखल करतो. हे आमचं दरवर्षाचं नित्यनेमाचं काम आहे. जोपर्यंत ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येत नाहीत तोपर्यंत हे  दुष्टचक्र असेच सुरू राहणार." अशी खंत बाबासाहेब राऊत या शिक्षकांनी व्यक्त केली. आज त्या वीटभट्टीवरील सर्व मुलं कारिवली शाळेमध्ये दाखल झाली असल्याची माहिती राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक अजय पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments