आम्ही फक्त विकासा बाबतच बोलतो; विकासाचेच राजकारण करतो- ना. डॉ. जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्र्यांनी केली खारीगाव उड्डाण पुलाची पाहणी

 


ठाणे (प्रतिनिधी) -  खारीगाव रेल्वे फाटका वरील उड्डाण पुलाला मंजुरी मिळवून देण्यासाठी शरद पवार यांनी तत्कालीन खासदार आनंद परांजपे यांच्यासह तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. या पुलाच्या उभारणीसाठी आर. ए. राजीव, असीम गुप्ता आणि संजीव जयस्वाल यांच्यामाध्यमातून निधी मिळवून घेतला आहे. त्यामुळे या पुलासह कळवा खाडीवरील तिसर्‍या पुलासाठी आमची प्रचंड मेहनत आहे. आम्ही फक्त विकासाशिवाय आम्ही दुसरे राजकारण करीत नाही, विकासाव्यतिरिक्त आम्ही दुसरे काही बोलत नाही, हे या निमित्ताने आपण सांगत आहोत, असे गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 


        गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी खारीगाव येथील रेल्वेफाटकावरील उड्डाणपुलाची पाहणी केली. या प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष मा. खा. आनंद परांजपे, मा. महापौर मनोहर साळवी, विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण, मा. विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, प्रमिलाताई केणी, कळवा प्रभाग समितीच्या अध्यक्षा वर्षा मोरे, अपर्णा साळवी, महेश साळवी, प्रकाश बर्डे, जितेंद्र पाटील, महिला कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, मा. नगरसेवक सचिन म्हात्रे, यांच्यासह राष्ट्रवादीचे कळव्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 


        या पुलाची मंजुरी ही आर. ए. राजीव हे आयुक्त असताना मिळाली होती. असीम गुप्ता यांच्या कार्यकाळात या पुलाच्या उभारणीला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. त्यानंतर रेल्वेच्या जागेतील पुलाचा खर्च रेल्वेने करायचा होता. तेव्हा खासदार आनंद परांजपे हे होते. तर, रेल्वे मंत्रीपदी मल्लिकार्जुन खरगे हे विराजमान होते. शरद पवार हे आनंद परांजपे यांच्यासह खरगे यांना भेटले अन् रेल्वेकडून मंजुरी मिळवून घेतली. त्यानंतर हा पूल ज्या जागेत उतरत  आहे; ती जागा मफतलालची असल्याने मफतलाल कंपनीकडून आक्षेप नोंदविण्यात आला. 


        मफतलाल कंपनीने ज्या जागेत पूल उतरविण्यात येणार होता; त्या जागेचे 39 कोटी रुपये कोर्टात भरावे लागतील, असे सांगितले. त्यावर ठामपाचे तत्कालिन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हे पैसे तत्काळ भरुन अंतिम मान्यता घेतली. आता हा पुल जवळ-जवळ पूर्णत्वास आला आहे. त्याचे कधीही उद्घाटन होईल. या उद्घाटनाबद्दल आम्हाला कोणताही वाद घालायचा नाही. पण, एवढेच सांगायचे आहे की या पुलासह कळवा खाडीवरील तिसर्‍या पुलामागे आमची प्रचंड मेहनत आहे. आपण आमदार झाल्यानंतर कळव्याच्या सर्व नगरसेवकांनी कळव्याच्या विकासासाठी हे सर्व करुन घेतले आहे. या कामाचे आम्हाला श्रेय घ्यायचे नाही.


         पण, विकासाच्या कामात आडकाठी न घालणार्‍या पालकमंत्री एकनाथ शिंदे याचे आभार मानतो. त्यांनी कधीही निधी देऊ नका, असे सांगितले नाही. किंबहुना निधी देत असताना आडकाठीही आणली नाही. त्यामुळे श्रेयाचा प्रश्न येतच नाही. फक्त माझ्या मतदारसंघाचे काम प्रामाणिकपणे कळवेकरांच्या हितासाठी करीत आहे. आज हा पूल झाल्याने कळवा पूर्व-पश्चिमेचा विकास होईल. या पुलाचे कळवा पूर्वेकडील काही काम शिल्लक आहे. ते लवकरच होईल. त्यानंतर त्याचे उद्घाटन करण्यात येईल. मी मतदारसंघात कितीवेळा भेट दिली. याचे मोजमाप मी करीत नाही. या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा मी केला; त्याच्यासाठी सन 2012 ते 2013 या तीन वर्षात आपण निधी मिळविला. आमचा हाही प्रयत्न आहे की, मफतलालची संपूर्ण जमीन विकत घ्यायची आणि त्याचा  विकास करायचा आहे. 


        हा विकास झाला तर देशातील सर्वात मोठा म्हणजे 39 हजार घरांचा गृहप्रकल्प या ठिकाणी उभा राहिल. त्यासाठीही आम्ही कोर्टात लढत आहोत. या पुलाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी करावे, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही ठाणे पालिकेला पत्रही दिले आहे. आम्ही फक्त विकासाशिवाय आम्ही दुसरे राजकारण करीत नाही, विकासाव्यतिरिक्त आम्ही दुसरे काही बोलत नाही, हे या निमित्ताने आपण सांगत आहोत. 


        या पुलाचे श्रेय कोणी घेत आहे का? असे विचारले असता, कळवेकरांना माहित आहे की काम कोण करीत आहे. सन 2009 नंतर या कळव्याचा कायापालट कोणी केला, हे कळवावासीयांना माहित आहे. त्यामुळे ते कोणालाही श्रेय देणार नाहीत. 2009 आणि 2014 च्या जाहिरनाम्यात आपण ही माहिती दिली आहे, असेही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी साांगितले. या पाहणीदौर्‍याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments