ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव यांच्या जन्मदिनी संगीतमय नजराणा ' मौसम प्यार का!


ठाणे, प्रतिनिधी  :  उत्तम नेतृत्व व अतुलनीय कर्तृत्वाची सांगड घालत ब्रह्मांड कट्टानामक सामाजिक बांधिलकी जपणारी चळवळ सुरु करणारा आपला माणुस  म्हणजे श्री. राजेश जाधव. सर्वसामान्यांच्या सामाजिक सांस्कृतिक प्रगतीसाठी झटणारे राजेश जाधव हे प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. ठाणे‌ शहराच्या सांस्कृतिक विकासामध्ये ब्रम्हांड कट्ट्याचा मोलाचा वाटा आहे. 


       राजेश यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पूर्वसंध्येला म्हणजेच १२ डिसेंबर रोजी ऑनलाइन माध्यमाद्वारे 'मौसम प्यार का' हा अजरामर प्रेमगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे संगीत क्षेत्रातील उभरते संगीत दिग्दर्शक व गायक भारत शिंदे व संगीत  कट्टयाचे  चतुरस्त्र गायक सचिन काकडे, शीतल बोपलकर व उमा धापते यांनी जाधव यांना कट्टयाच्या वतीने मानवंदना दिली. 


        सुरेल गळ्याची गायिका शीतल हिने आपल्या तरल आवाजातील ' निंदिया से‌ जागी बहार', ' मोह मोह के धागे' या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. 'अधीर मन झाले', 'नैनो मे बदरा' ही गीते सुंदररित्या सादर करुन उमा यांनी सशक्त गायकीचे विविध पैलू उलगडले. सुरांचे बादशाह सचिन यांनी 'ये ज़मी गा रही है', 'मुझे रात दिन' या गीतांद्वारे सुरांप्रतिचा ध्यास तसेच भावनिक उत्कटता रसिकांपर्यंत पोहोचवली. 


         यावर सुरांचे कोंदण चढवले ते भारत यांनी 'दिल दिवाना', 'गो-या गालाची' या गीतांमधुन दर्शविलेली त्यांच्या आवाजातील प्रासादिकता वाखाणण्याजोगी होती. सचिन व शीतल यांनी 'मौसम प्यार का' व आंखोंकी गुस्ताखिया', भारत व शीतल यांनी ' आते‌ जाते', 'ये मेरा दिल', ' साथीया तुने क्या किया', भारत व उमा यांनी 'आके तेरी बांहो मे', बाहों के दरमियां', सचिन व उमा यांनी ' क्या यही प्यार है' व ' एक मेरे हमसफर' ही रोमारोमात चैतन्य फुलवणारी बहारदार द्वंद्वगीते सादर करुन रसिकांच्या मनावर जादू केली.


           सोनाली पाठक यांनी सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. अप्रतिम संवादकौशल्याने नटलेल्या माहितीपूर्ण व दर्जेदार निवेदनाने कार्यक्रमाला चारचांद लावले. राजेश यांनी सर्व कलाकारांचे आभार मानले. तर दुसऱ्या दिवशी राजेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आधारवड या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात एक छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आला होता ज्यात सामाजिक व राजकीय वर्तुळातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली व राजेश जाधव यांना शुभेच्छा दिल्या. 


          याप्रसंगी ब्रह्मांड कट्टा कलासंस्कार‌ तर्फे अत्यंत मजेशीर खेळांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यात एका वेगळ्या रुपात जाधव सहभागी झाले होते व‌  उपस्थितांनी या खेळांचा मनसोक्त आनंद लुटला. अशाप्रकारे आपल्या या लाडक्या प्रेरणास्थानाला प्रेममयी शुभेच्छा देत रसिकांनी राजेश जाधव यांचा जन्मदिन सोहळा उत्साहात पार पाडला.

Post a Comment

0 Comments