अभिनय कट्ट्यावर प्रशासकीय संवादाची सुरुवात

 


ठाणे , प्रतिनिधी  :  अभिनय कट्टा म्हणजे ठाण्याचे खऱ्या अर्थाने सांस्कृतिक प्रवेशद्वार ठरले आहे. आजपर्यंत गेल्या अकरा वर्षात पाचशे  प्रयोग करून दर रविवारी ठाणेकरांचे केवळ मनोरंजनच नाही तर समाजप्रबोधनसुद्धा केले आहे. याचधर्तीवर किरण नाकती यांच्या संकल्पनेतून प्रशासकीय संवाद या उपक्रमाची सुरुवात रविवारी अभिनय कट्ट्यावर करण्यात आली.


         


             प्रशासकीय संवाद सुरू करण्यामागचा हेतू हाच की विविध शासकीय योजना मग त्या महापालिका, राज्य सरकाराच्या,  अख्यातीरेत असो किंवा केंद्र सरकारच्या  असोत. सर्व योजना विविध दाखले काढण्यासाठीची प्रक्रिया त्याचप्रमाणे प्रत्येक विभागात काम कसं चालतं याचा आढावासुद्धा या माध्यमातून व्हावा व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या सर्व गोष्टी पोहोचाव्यात असे मत किरण नाकती यांनी व्यक्त केले.            या उपक्रमाचा पहिला संवाद ठाण्याचे तहसीलदार युवराज बांगर यांच्यासोबत साधण्यात आला. त्याचा स्वतःचा जीवनप्रवास शालेयशिक्षणापासून ते एमपीएससी पर्यंत घरची परिस्थिती फारशी चांगली नसतानाचा यशस्वी प्रवास संवादातून समोर आला. त्याचप्रमाणे अनेक कारवाया करताना बांगर यांनी कायद्याच्या चौकटीत राहून अवैद्य धंदे बंद पाडले. असे काही प्रसंग त्यांनी अधोरेखित केले.


          किरण नाकती यांनी ही मुलाखत घेतल्याने अनेक विषयांवर तहसीलदारांना बोलत केलं. विविध दाखले, संजय गांधी निराधार योजना ,श्रावण बाळ योजना अशा अनेक योजनांची माहिती त्यांनी दिली. तसेच विभागातील ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल व त्यात ते बसत असतील,तर त्यांनी किरण नाकती यांच्याकडे संपर्क साधावा असे सांगण्यात आले.उपस्थित तरुण एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना या संवादातून योग्य ते मार्गदर्शन मिळालं.


        नौपाडा विभागातील रहिवाश्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या व त्याचे योग्य ते निराकरण तहसिलदार यांनी केले व कट्ट्याला सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व अशा उपक्रमांमुळे स्थानिक नागरिकांना खूप मोठा फायदा होईल, याकरिता आम्ही किरण नाकती यांचे आभार मानतो असे मत नौपाडा विभागातील स्थानिक रहिवासी मंगला कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या कट्ट्याचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले.

Post a Comment

0 Comments