भिवंडी,दि18(प्रतिनिधी) शहरातील एका घराच्या खोलीत गांजा साठविल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या घरावर छापा टाकला असता ७५ किलो गांजा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून गांजा तस्कराला बेड्या ठोकल्या आहेत. कमल हसन रजा उर्फ गुड्डु अन्सारी (वय २४ वर्षे) असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे.
१६ लाख ३७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त ..
अमली पदार्थ तस्कर कमल हसन रजा उर्फ गुड्डु अन्सारी हा भिवंडी शहरातील फातमा नगर मध्ये राहतो. तस्कराने फातमानगर येथे राहत असलेल्या घरातील एका खोलीत अवैध गांजा साठवला असल्याची खबर भिवंडी गुन्हे शाखा युनिट-२ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने फातमा नगर, मैदानाच्या बाजुला असलेल्या कमल हसन याच्या घरावर छापा माराला असता, घरातुन एकुण वजन ७४.६२४ कि. ग्रॅम, वजनाचा मानवी शरीरावर परिणाम करणारा गांजा हा अंमली पदार्थ, रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकुण १६ लाख ३७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे.
तस्करला २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ..
पोलीस पथकाने मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला. याप्रकरणी स्थानिक शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तस्कराला आज (शनिवारी) न्यायालयासमोर हजर केले असता त्यास २२ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिटचे सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र जाधव, पोलीस उप निरीक्षक शरद बरकडे, पोलीस उप निरीक्षक रमेश शिंगे, सहायक पोलिस उप निरीक्षक रामसिंग चव्हाण, सहायक पोलिस उप निरीक्षक हनुमंत वाघमारे, पोलीस हवालदार राजेंद्र चौधरी, पोलीस हवालदार रामचंद्र जाधव, पोलीस हवालदार अरूण पाटील, पोलीस नाईक साबीर शेख , पोना सचिन जाधव, पोलीस नाईक रंगनाथ पाटील आदींनी केली आहे.
0 Comments