बांधकाम व्यावसायिकां कडून बुकिंग धारकांची तीन कोटींची फसवणूक

■पैसे भरूनही सदनिकेचा अद्यापही ताबा नाही त्रस्त नागरिकांनी केली रेरा व पोलिसां कडे तक्रार


कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  मोहने येथे भागीदार असणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांनी फ्लॅट बुकिंग करणाऱ्या किमान ३८ लोकांचे सुमारे तीन कोटी रुपये घेऊन घरांचा ताबा अद्यापही दिला नसल्याने जी प्लस सातची इमारत कामाविना जैसे थे अवस्थेत असल्याने या विरोधात बुकिंग करणाऱ्यांनी पोलिस तसेच रेराकडे न्यायाची मागणी केली आहे.


 

मोहने येथील शांताराम पाटील नगर येथे बांधकाम  करीत असलेले व्यावसायिक  आनंद दुबेभरत मलिक व विजय उपाध्याय या तिघांनी बालाजी डेव्हलपर्सच्या नावाने गार्डन इस्टेट संकुलनाचे २०१६ रोजी बांधकाम सुरू केले होते. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या नगररचना विभागाने या कामाला मंजुरी दिल्याने परिसरात असणाऱ्या नागरिकांनी लाखो रुपये देऊन खरेदी केलेल्या सदनिकेची नोंदणीकृत खरेदी करारनामा केला होता. एकूण ५६ फ्लॅट अस्तित्वात असून ३८ नागरिकांनी बुकिंग करतावेळेस लाखो रुपये बांधकाम व्यावसायिकांना  त्यावेळेस दिले होते.बुकींग करताना इच्छुकांनी खासगी तसेच पतपेढी व विविध वित्तीय बँकांकडून कर्ज काढीत विकासकांना  दर महिन्याला लोनचा हप्ता देण्यात येत होता. ३८ नागरिकांचे लोनचे हप्ते पूर्ण फिटूनही अद्यापही त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आलेला नाही. बांधकाम व्यावसायिकांकडून फ्लॅट धारकांना २०१९ ते २०२० पर्यंत फ्लॅटचा ताबा देण्याचे सांगण्यात आले होते. २०२१ हे वर्षही उलटून चालले असताना बांधकाम व्यावसायिक बांधकाम करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. रेराकडून देखील २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सदनिकेचा ताबा देण्याबाबतची शेवटची तारीख देण्यात आली होती.


 

या इमारतीतील घरे विकासकाने बुकिंग रक्कम घेऊन नोंदणीकृत करारनामा असतानाही काम अपूर्ण ठेवले असून कामाकडे विकासक संपूर्ण दुर्लक्ष करीत असून सदनिकाधारकांना कोणताही प्रतिसाद देत नसल्याचा आरोप बुकींग धारकांनी केला आहे. विकासकांच्या अशा वर्तनामुळे सदनिकाधारकांची कर्जाचे हप्ते व घरांचे भाडे यामुळे सदनिकाधारकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. सदनिकाधारकांची फोन न उचलणे आणि  उचल्यास उडवाउडवीची उत्तरे देणे आदी प्रकार होत असल्याने याबाबत सदनिकाधारकांनी खडकपाडा पोलीस स्टेशन तसेच रेराकडे याबाबत तक्रार केली असल्याची माहिती सदनिका बुकिंग केलेले प्रकाश टकले यांनी दिली.  या सदनिका घेणारयांमध्ये सर्वसामान्य नोकरदार, महिला वर्ग, जेष्ठ नागरिक आदींचा समावेश असून काहींनी आपल्या आयुष्य भराची जमापुंजी यामध्ये लावली आहे. त्यामुळे हे नागरिक स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. विकासकांनी मोठ्या प्रमाणात आमची किमान तीन कोटी रुपये घेऊनही सदनिका ताब्यात मिळत नसल्याने फसवणूक होत असल्याचा आरोप ३८ सदनिका बुकिंग केलेल्या नागरिकांनी केला आहे.यासंदर्भात विकासक भरत मलिक यांच्याशी संपर्क साधला असता कोविडमध्ये काम बंद होते मात्र आता ते सुरू करण्यात आले असून इमारतीचे फिनिशिंगचे काम सुरू करणार असून लवकरच त्यांना सदनिकेचा ताबा देण्यात येणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments