कल्याण , प्रतिनिधी : बल्याणी परिसरातील पुणे वडोदरा महामार्गात बधित होणाऱ्या चाळकऱ्यांच्या मोबदला प्रश्नी स्थानिक शिवसेना नगरसेविका नमिता मयूर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असुन बाधित चाळकऱ्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कल्याण नजीकच्या बल्याणी, नांदप, उम्भारणी या भागातून जाणार्या पुणे वडोदरा महामार्गासाठी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून या मार्गात या परिसरातील सुमारे २००० चाळी बाधित होत आहेत. या चाळकऱ्यानी १० ते १२ वर्षापूर्वी या परिसरातील चाळीत घरे खरेदी केली होती मात्र शासनाकडून या चाळकऱ्यांना मोबदला देण्याऐवजी जागा मालकांनाच घरटी मोबदला दिला जात होता. याबाबत हवालदिल चाळकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी स्थानिक शिवसेना नगरसेविका नमिता मयूर पाटील यांनी आवाज उठवित प्रशासनाकडे पाठ पुरावा केला.
२०१९ मध्ये विधानसभेत रामराजे निबांळकर यांनी सुमारे २८ कोटी ८६ लाख रू मोबदला बाधित चाळकऱ्यांना मिळण्या बाबत निर्देश दिले होते. विधानसभेत आमदार रवींद्र फाटक यांनी या बाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. माजी नगरसेविका नमिता पाटील यांनी बाधित चाळकर्याच्या प्रश्नाबाबत प्रशासनाला उपोषणाचा इशारा देत प्रशासनाचे लक्ष वेधित याबाबत पाठपुरावा केल्याने त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे दिसत आहे. सोमवारी उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील यांना निवेदन देत पुणे वडोदरा महामार्गात बधित होणाऱ्या चाळकर्याच्या मोबदला लवकर मिळावा यासाठी निवेदन दिले.
याबाबत उपविभागीय आधिकारी अभिजित भांडे पाटील यांना विचारले असता पुणे वडोदरा महामार्गात बधित होणाऱ्या चाळकर्याच्या प्रश्नाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीनी निवेदन दिले असुन याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमापन विभाग, तलाठी, यांच्या मार्फत चाळकर्याच्या सर्व्हे करून दोन महिन्यात मोबदला देण्याचे सुरु केले जाईल असे सांगितले. त्यामुळे या बाधित चाळकऱ्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
0 Comments