मानपाडा पोलिसांनी केले ७ तोळे सोने परत

 


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  लग्नसमारंभातून परतत असतांना रिक्षात विसरलेले ७ तोळे सोन्याचे दागिने मानपाडा पोलिसांनी शोध घेत महिलेला परत केले आहेत.


 

डोंबिवली पूर्वेत दावडी परिसरात राहणाऱ्या शोभा गायकवाड यांच्या मुलीच्या मैत्रिणीचे काल दादर येथे लग्न होते. या लग्नासाठी सर्व कुटुंबीय दादरला गेले होते. लग्न समारंभ आटोपून रात्री नऊच्या सुमारास गायकवाड कुटुंबीय डोंबिवली रेल्वे स्थानकावर आले आणि तेथून दावडी येथे घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. त्याना दावडी येथे सोडून रिक्षा चालक तेथून निघून गेला. घरी गेल्यानंतर त्याना ७ तोळे दागिने रिक्षात राहिल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत रिक्षा चालक निघून गेला होता.



गायकवाड यांच्याकडे रिक्षाचा नंबर नव्हता त्यांनी तत्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. मानपाडा पोलिसांनी रिक्षा कशी होती याचे वर्णन गायकवाड यांच्याकडून जाणून घेतले आणि मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे यांच्या पथकाने त्वरित तपास सुरू केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. या सीसीटीव्हीत ती रिक्षा आढळून आली. रिक्षाच्या हूडवर पांढऱ्या रंगाची पट्टी होती. रिक्षाचा नंबर व त्या पट्टीच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध घेतला.



 आधी रिक्षा चालकाने मला याबाबत काही माहीत नसल्याचे सांगितले मात्र पोलिसी खाक्या आवळताच त्याने दागिने परत केले आणि गुरुवारी पोलिसांनी शोभा गायकवाड यांना त्यांचे दागिने परत केले आहे. त्यामुळे अवघ्या तासाभरात पोलिसांनी दागिने शोधून परत केल्याने महिलेने मानपाडा पोलिसाचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments