लविजयदुर्ग किल्ल्याच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी २९ डिसेंबरला हिंदु जनजागृती समितीचे राज्यव्यापी आंदोलन

हिंदु जनजागृती समितीची राज्यातील किल्ल्यांच्या रक्षणासाठी मोहीम..


कल्याण, प्रतिनिधी  :  छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा राष्ट्रीय स्मारक किल्ले विजयदुर्ग ही महाराष्ट्राची अस्मिता आहे; मात्र छत्रपतींच्या महाराष्ट्रात असलेल्या या किल्ल्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पडझड झाल्याने विजयदुर्ग किल्ला पाहायला जाणार्या दुर्गप्रेमींची मान शरमेने खाली जाते; मात्र किल्ल्याच्या संवर्धनासाठी असलेल्या पुरातत्त्व खात्याची अनास्था चीड आणणारी आहे. राज्यातील गडकोट हा आपला ऐतिहासिक वारसा असून हिंदु जनजागृती समितीने राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी मोहीम हाती घेतली आहे.


            विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रशासनाने तातडीने कृती करावी. याकडे लक्ष वेधण्यासाठी हिंदु जनजागृती समिती, तसेच शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी २९ डिसेंबर या दिवशी राज्यव्यापी आंदोलन छेडणार, *असा इशारा समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक . सुनील घनवट यांनी दिला आहे.  या वेळी समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक  संदेश गावडे आणि हिंदु विधिज्ञ परिषदेच्या अस्मिता सोवनी उपस्थित होत्या.


             घनवट पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्या सिंधुदुर्गातील जलदुर्गांपैकी एक असलेला दुर्ग म्हणजे विजयदुर्ग किल्ला होय. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण होते. हे किल्ले सध्याच्या पिढीला प्रेरणा देतात; मात्र या किल्ल्यांची योग्य देखभाल होत नसल्याने त्यांची पडझड होत आहे. त्यामुळे हा आपला ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.


            किल्ल्याची पहिली तटबंदी अनेक ठिकाणी ढासळली आहे. महाद्वारासमोरील दुसरी तटबंदीही ढासळली असून एक वर्षाहून अधिक काळ लोटला, तरी त्याची डागडुजी केलेली नाही. त्याची पहाणी करण्याकरता राजकीय नेते, लोकप्रतिनिधी येथे येऊन गेले. पुरातत्त्व खात्यानेही आश्‍वासने दिल्याचे कळते; मात्र अद्यापही या तटबंदीचे काम करण्यात आलेले नाही. किल्ल्याच्या महाद्वाराला दरवाजेच नाहीत. सदरेच्या तटबंदीवर एक वर्षांपूर्वी कोसळलेला वड त्याच स्थितीत आहे. 


             वड कोसळून तटबंदी दुभंगली आहे. किल्ल्याचा परिसर पहात असतांना अनेक ठिकाणी झाडांची पाळेमुळे बुरुज आणि तटबंदीत घुसून ते कोसळण्याच्या स्थितीत आहेत. दर्या बुरुजाच्या तटबंदीचा तळाकडील भाग समुद्राच्या पाण्यामुळे आतपर्यंत पोखरला गेला असून बुरुज कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. धुळपांचे भुयार बुजलेल्या स्थितीत आहे. भुयारी मार्ग मोकळा केल्यास शिवकालीन इतिहासातील बर्‍याच गोष्टी समजून येण्याची शक्यता आहे.


       हा किल्ला जिंकून घेतल्यावर निशाणकाठी टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वहस्ते पवित्र भगवा ध्वज फडकावला होता. आज या ठिकाणी भगवा ध्वज न लावता वादळाचा बावटा लावण्यात येतो. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावर भगवा ध्वज लावण्यास आडकाठी कोण करत आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्यदैवत श्री भवानी मातेची मूर्ती असलेल्या ठिकाणी मंदिर किल्ल्यावर का नाही ? असे प्रश्न  घनवट यांनी उपस्थित केले.

Post a Comment

0 Comments