डोंबिवली ( शंकर जाधव) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या शरद महोत्सव या कार्यक्रमासाठी जल संपदा मंत्री जयंत पाटील डोंबिवली येथे आले होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्यांनी रेल्वेचा पर्याय निवडला. विशेष म्हणजे रेल्वे उशिरा आल्यामुळे जसा चाकरमान्यांना इच्छित स्थळी पोहचण्यासाठी विलंब होतो त्याचप्रमाणे पाटील यांना पोहचण्यासाठी ५ ते ७ मिनिटांचा विलंब झाला. यावेळी त्यांचे स्वागत राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे ठाणे जिल्हाध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी केले.
डोंबिवलीला येताना शीळ फाटा आणि मानपाडा रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्यांनी रेल्वेचा पर्याय निवडला. सायंकाळची वेळ असल्याने गर्दीची वेळ होती. त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांनी फलाटावर केलेल्या गर्दीमुळे नेमके काय झाले असा प्रश्न प्रवाशांना पडला. मंत्री रेल्वेने येत आहेत हे समजल्यावर डोंबिवलीकर आश्चर्य व्यक्त करत होते. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरून ५.५६ ची टिटवाळा जलद रेल्वे पकडली होती.
त्यांनी गार्डच्या डब्यातून प्रवास केला. डोंबिवली पर्यंत जलद पोहचण्यासाठी याआधी डॉ. खासदर श्रीकांत शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रेल्वेचा पर्याय निवडला.
0 Comments