विहिरीत पडलेल्या श्वानाच्या पिल्लाला अग्निशमन जवानांनी दिले जीवनदान


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : विहिरीत पडलेल्या श्वानाच्या पिल्लाला अग्निशमन जवानांनी जीवनदान दिल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे.


देव तारी त्याला कोण मारी अशीच काही प्रचिती कल्याण पश्चिम मधील लाल चौकी परिसरात राहणाऱ्या प्राणी मित्रांना आली. कल्याण पश्चिम येथील लाल चौकी परिसरात असलेल्या अर्ध पाणी भरलेल्या विहिरीत श्वानाचे पिल्लू पडल्याचे स्थानिक नागरिकांना कळाले. सुदैवाने विहिरीत पडलेल्या थर्माकोल वर पिल्लाला आसरा मिळाल्याने पिल्लाचा जीव वाचला. 


भीती पोटी पिल्लू विव्हळत असल्याने स्थानिकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण पिल्लू थर्माकोल वरून खाली पाण्यात पडण्याची भीती असल्याने स्थानिकांनी तातडीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला संपर्क केला.


घटनेची गांभीर्याने दखल घेऊन अग्निशमन दलाने तातडीने सूत्रे हलवत या ठिकाणावर धाव घेतली. त्यातच रस्ता निमुळता असल्याने अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचण्यास अडथळा निर्माण होत होता. शेवटी  बचाव अभियानासाठी लागणाऱ्या सर्व साहित्य खांद्यावर घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले आणि विहिरीत पडलेल्या श्वानाच्या पिल्लाला सुखरूप बाहेर काडून जीवनदान दिले.


 अग्निशमन दलाचे लीडर रवींद्र ईसामे यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल ईसामे, पवन पाटील, लतेश पाष्टे, अक्षय ईसामे आणि नितीन ठाकरे आदींनी हे बचावकार्य पूर्ण केले.

Post a Comment

0 Comments