वालधुनीच्या स्व. मीनाताई ठाकरे वचनपूर्ती समाज मंदिरासाठी दीड कोटींचा निधी


डोंबिवली (  शंकर जाधव ) गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेअभावी वापराविना पडून असलेल्या कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरातील शिवाजी नगर येथील स्व.मीनाताई ठाकरे समाज मंदिराच्या नुकतीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दुरावस्था झालेले हे समाजमंदिर पाडून त्या ठिकाणी नवे समाज मंदिर बांधण्याचा शब्द कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्थानिकांना दिला होता.


         त्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून नगरविकास विभागाने यासाठी १.५० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या समाज मंदिराच्या उभारणीचा मार्ग  मोकळा झाला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक कल्याणकर नागरिकांना दिलेले वचन पूर्ण केले आहे.


    कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वालधुनी परिसरातील शिवाजीनगर भागात असलेल्या स्व. मीनाताई ठाकरे समाज मंदिराची दुरावस्था झाली होती. त्यामुळे हे समाज मंदिर मोठ्या काळापासून बंद होते.परिणामी या भागातील नागरिकांना सामाजिक कार्यक्रमांसाठी जागा  उपलब्ध नव्हती. त्यामुळे हे समाज मंदिर निष्काषित करून त्या जागी नवे समाज मंदिर बांधावे अशी मागणी स्थानिकांची होती. 


      नव्या समाज मंदिराच्या उभारणीसाठी स्थानिकांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. कमी वेळेत जे समाज मंदिर उभे करण्याचा शब्द खासदार डॉ. शिंदे यांनी दिले होते.त्यानुसार खासदार डॉ. शिंदे यांनी या समाज मंदिराच्या उभारणीसाठी नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुमारे दीड कोटी रूपयांच्या निधीची मागणी ऑक्टोबर महिन्यात केली होती. 


       स्थानिकांच्या भावना आणि खासदारांच्या मागणीला तातडीने प्रतिसाद देत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महिनाभराच्या आत समाज मंदिरासाठी सुमारे दीड कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेअंतर्गत हा निधी वितरीत करण्यात आला आहे.मागणीच्या एका महिन्यात हा निधी तातडीने उपलब्ध  करून देणाऱ्या पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार डॉ.शिंदे यांनी स्थानिकांच्या वतीने आभार मानले आहेत. 


      तर स्व. मीनाताई ठाकरे समाजमंदिर पूर्णतः निष्काशीत करून नव्याने उभारण्याचा शब्द खासदार डॉ.शिंदे यांनी दिला होता. तो शब्द पूर्ण करत दिलेले वचन वेळेत पूर्ण केल्याबद्दल स्थानिक कल्याणकर नागरिकांनी डॉ. शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments