कल्याण-डोंबिवली - पलावातील 1200 डिलिव्हरी राईडर्स संपावर


डोंबिवली ( शंकर जाधव ) फूड डिलव्हरी करणाऱ्या कंपनीच्या जवळपास 1200 डिलिव्हरी बॉईजनी गुरूवारी संपाची हाक दिली असून त्यांनी आपली कैफियत डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या समोर मांडली. आपल्यावर होत असलेल्या पिळवणुकीची माहिती या बॉईजनी दिली. 


                 गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने या व समकक्ष कंपन्यांच्याकडून त्यांच्याकडे काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉईजचे आर्थिक शोषण व पिळवणूक करून कामगार कायद्याचा भंग करण्यात येत आहे. कल्याण-डोंबिवली-पलावातील जवळपास 1200 राईडर्स संकटात सापडले असल्याच्या व्यथा या बॉईजने आमदारांसमोर मांडल्या.


                असंघटित कामगार, नोकरीची नसलेली हमी,
दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आणि कुटुंबातील
सदस्यांची काळजी, आदी अनेक गोष्टी या कामगारांच्या
डोक्यावर असल्याचा गैरफायदा संबंधित कंपन्या घेत आहेत. कामगारांनी न्याय-हक्काची मागणी केली असता पोलिसी कारवाई आणि कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात येते. त्याचप्रमाणे नव्याने कामगार भरती करण्याची भीती घालण्यात येते. हे सारे प्रकार कामगारांनागुलाम म्हणून वागवण्यात येते याचे प्रतीक असल्याचा आरोपही या बॉईजनी आमदार रविंद्र चव्हाण यांच्याशी बोलताना व्यक्त केला.


           रॅपीडी बंद करण्यासह शेडोफॅक्सला ऑर्डर देणे बंद करण्यात यावे, झोनच्या बाहेर गेल्यावर ऑर्डर असेपर्यंत लॉगईन असतो. पण जर ऑर्डर डिलिव्हरी मार्क करतो त्या रायडरला लॉगआऊट करते, हे बंद करावे, खरे किलोमीटर दाखवावे, कस्टमरचा पत्ता ऑर्डर पिकअप करण्याच्या आधी दाखवावा, पेट्रोलचे पैसे पुरेपुर मिळावे, जी फॉर्म भरूनही कंपनीकडून काही प्रतिसाद मिळत नाही. 


       इंस्टाग्रामच्या ऑर्डर 7 ते 8 रूपये किमीपर्यंत देण्यात यावे, आदी मागण्या या उपस्थित डिलिव्हरी बॉईजनी केल्या. या मागण्यांचे निरसन करावे, तोपर्यंत कल्याण-डोंबिवली-पलावाच्या रायडर्सचा संप सुरू राहणार असल्याचा इशारा या बॉईजनी आमदार रविंद्र चव्हाण यांना सादर केलेल्या निवेदनाच्या माध्यमातून दिला. 


     यावर आमदार चव्हाण म्हणाले, सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या मागण्यांचे सर्व लोकप्रतिनिधींना स्वयंस्पष्ट निवेदन द्यावे. ही कार्यवाही रविवारपर्यंत पूर्ण करावी. त्यानंतर संबंधित कंपनीच्या प्रतिनिधी/अधिकारी अधिकाऱ्यांना बोलविण्यात येईल आणि त्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसमक्ष योग्य तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Post a Comment

0 Comments