कळवा, मुंब्रा भागातील वाहतूक कोंडी निकाली निघणार ना. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि एमएमआरडीए आयुक्तांंनी केली सर्व प्रकल्पांची पाहणी

■खाडीवरील तिसरा पूल पटनीजवळ उतरणार मुंब्रा पश्चिमेकडे नवीन रस्ता बांधला जाणार विटाव्यातील पादचारी पुल चार महिन्यात पूर्ण होणार...


ठाणे (प्रतिनिधी) - कळवाा, मुंब्रा, विटावा भागाला भेडसावणार्‍या वाहतूक कोंडीचा प्रश्न आता कायमस्वरुपी निकाली निघणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून कळवा खाडीवर उभारण्यात येत असलेला तिसरा पूल छ. शिवाजी महाराज रुग्णालय येथे न उतरविता आता तो पटनी मैदानाजवळ उतरविण्यात येणार आहे. तर, कळव्यात प्रवेश करताना खाडीपुलाच्या डाव्या बाजूला नवीन रस्ता तयार करुन तो आत्माराम पाटील चौकापर्यंत नेण्यात येणार आहे. शिवाय, अनेक दिवसांपासून रखडलेला विटाव्याच्या पुलाचे कामही आगामी चार महिन्यात पूर्णत्वास जाणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


       कळवा- मुंब्रा येथील वाहतूक कोंडीवर मात करणार्‍या काही प्रकल्पांची सूचना ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एमएमआरडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये केली होती. नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने या प्रकल्पांना अजेंड्यावर आणण्यात आलेले आहे. याच प्रस्तावित प्रकल्पांची पाहणी ना. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन यांनी आज केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ना. डॉ. आव्हाड यांनी ही माहिती दिली.  


      कळवा- मुंब्रा भागातील वाहतूक कोंडीवर मात करणारे काही मोठे प्रकल्प राजीव हे एमएमआरडीचे आयुक्त असताना प्रस्तावित केले होते. त्याच अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएची एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये या प्रस्तावित प्रकल्पांना मूर्त स्वरुप देण्याबाबत चर्चा झाली. या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन यांच्यासह पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या पाहणी दौर्‍यानंतर श्रीनिवासन यांनी या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. या प्रकल्पांचा विकास आराखडाही तयार करण्यात आला आहे.


       त्यापैकी, पहिला प्रकल्प खाडीपुलावरील तिसर्‍या पुलाचा आहे.  कळवा खाडीवरील तिसरा पूल छ. शिवाजी महाराज रुग्णालयासमोर उतरणार आहे. हा पूल जर शिवाजी महाराज रुग्णालयासमोर उतरला तर वाहतूक कोंडीमध्ये भरच पडणार आहे. त्यामुळे हा पुल पटनी मैदानाजवळ उतरविण्यात आल्यास वाहतूक कोंडीवर मात करणे सहज शक्य होणार आहे. त्यास एमएमआरडीए आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्याच अनुषंगाने  दुसरी बाब अशी की, सर्वच ठिकाणची वाहने ही छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येत असते. ही वाहतूक परस्पर अन्यत्र वळविण्यात आल्यास या ठिकाणची वाहतूक कोंडी दूर होणार आहे.


        त्यासाठी कळवा पुलाच्या डाव्या बाजुला विद्यमान रस्त्याला-खारीगावला समांतर रस्ता बांधून तो बाहेरच्या बाहेर वळवून थेट आत्माराम पाटील चौकापर्यंत नेण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास कळव्यातून जाणारी वाहतूक परस्पर बाहेरच्या बाहेर वळविली जाणार असून त्याद्वारे वाहतूक कोंडी कायमची निकाली निघणार आहे. याचाही विकास आराखडा तयार आहे, अशी माहिती ना. डॉ. आव्हाड यांनी दिली. 


         मुंबई-पुण्याला जोडणारा रस्ता पूर्वी मुंब्रा येथून जात होता. मात्र, वाशीपुलाच्या  उभारणीनंतर पुण्याकडे जाणारी आणि पुण्याहून येणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. तरीही, मुंब्य्रातून जाणार्‍या रस्त्याला समांतर रस्ता नसल्याने  मुंब्रा-कौसा येथील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे. पर्यायी रस्ते देण्याची मागणी आपण केली आहे. आत्माराम पाटील यांचा बंगल्यासमोर उतरणारा रस्ता मुंब्रा पश्चिमेला जातो. तेथून रस्ता बांधून तो चुहा ब्रिजकडून मित्तल ग्राऊंड आणि पुढे वाय जंक्शन आणि शिळकडे जोडला तर येथील सर्व वाहतूक परस्पर स्वतंत्र मार्गाने जाऊन पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील वाहतूक विभागली जाणार आहे.


         तसेच,  विटाव्याला जोडणारा रेल्वेपुलाला समांतर असणारा खाडीवरील पादचारी पुल काही तांत्रिक अडचणींमळे थांबलाा होता. मात्र, आता या अडचणी दूर झालेल्या असून आगामी चार महिन्यात हा पादचारी पुल मार्गी लागणार आहे, असेही ना. डॉ. आव्हाड यांनी सांगितले. खारीगावच्या रेल्वे उड्डाणपुलाला संलग्न असलेली काही कामे प्रलंबित होती. आता ती पूर्णत्वास येत आहेत. त्यामुळे लवकरच हा पुल वाहतुकीस मोकळा होणार आहे. दरम्यान, या दौर्‍यामध्ये माजी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, नगरसेविका आरती गायकवाड, मंदार किणी आदी सहभागी झाले होते. 


■मुंब्रा बायपासवर टोल सुरु करावा


            मुंब्रा बायपास हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. दोन मार्गावरील टोल वाचविण्यासाठी अनेक अवजड वाहनचालक मुंब्रा बायपास मार्गाचा वापर करीत आहेत. परिणामी, ह्या रस्त्याची दूरवस्था होत आहे. जर या ठिकाणी पथकर सुरु केला तर टोल वाचविण्यासाठी या मार्गाचा अवलंब करणारे या मार्गावर येण्याचे प्रमाण कमी होईल. अन् येथील रस्त्याची दुरवस्था होणार नाही. यासाठी आपण मागील सरकारकडेही मागणी केली होती. आता अशोक चव्हाण यांनी त्यास मान्यता दिली आहे. टोल बसविल्याने आता रस्त्यावरील भार कमी होऊन रस्ता सुस्थितीमध्ये राहिल, असेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले. 


■मफतलाल कंपनीची जमीन म्हाडाने विकत घ्यावी


         आम्ही असा प्रयत्न करतोय की कोर्टाद्वारे मफतलाल कंपनीची संपूर्ण जमिन विकत घेण्याची म्हाडाची तयारी आहे. आजच्या गणितानुसार हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा निवासी संकुल प्रकल्प असेल. जर कोर्टाने हा प्रकल्प मान्य केला. तर, तिथे 29 हजार घरे बांधणे शक्य होणार आहे. शिवाय, शेजारची झोपडपट्टीही विकसीत होईल. त्यामुळे कळव्याचा विकास होईल. कोर्टाने तीन हिस्से करावेत; कामगार, बँक आणि सरकार! सरकारला जे देणे लागत आहे.


         म्हाडा ही सरकारचीच संस्था असल्याने म्हाडा आणि सरकार ते निश्चित करेल. कामगारांची देणी म्हाडा तत्काळ देईल. राहिला बँकर्सचा प्रश्न तर डुबीत गेलेले हे पैसे एकाच वेळी समझोत्याने निकाली काढून या ठिकाणी राज्यातील सर्वात मोठा गृहप्रकल्प उभा राहिल. या संदर्भात अडॅव्होकेट जनरल कुंभकोणींशी चर्चा झाली असून तसा प्रस्ताव ते कोर्टात मांडणार आहेत. त्यातून कळव्याचा चेहरामोहराच बदलणार आहे.

Post a Comment

0 Comments