नागरी सुविधा पुरविण्यात ठामपा सक्षम नाही, असा फलक लावा! विरोधी पक्षनेत्यांचा महासभेत घणाघातठाणे (प्रतिनिधी) - गेल्या अनेक दिवसांपासून नागरी सुविधांच्या बाबतीत ठाणे शहरात बोंबाबोंब सुरु आहे. निधी मंजूर असतानाही सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट आहे. कोरोनाच्या नावाखाली नागरिकांना नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत. 


         जर, सुविधा पुरवण्यासाठी ठामपाकडे निधी नसेल तर पालिका प्रशासनाने दिवाळखोरी जाहीर करुन आपण नागरी सुविधा पुरविण्यास सक्षम नसल्याचे फलक लावावेत; अन्यथा, असे फलक आपणच लावू, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठविली. 


      ठाणे शहरातील अनेक वस्त्यांमधील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठविली. 


       ठाणे पालिका हद्दीतील अनेक शौचालयांची अवस्था आत्यंत वाईट असून पाणी-वीज अशा मूलभूत सुविधाही पुरविल्या जात नाहीत. ही बाब खेदाने नमूद कराविशी वाटत आहे. ठाणे पालिकेकडे निधी नाही, असे कारण सांगून नागरी सुविधांच्या बाबतीतही हयगय केली जात आहे. अशी हयगय आता आपण खपवून घेणार नाही. 


         जर, या नागरी सुविधा पुरवण्यासाठीही निधी नसेल तर ठामपा आयुक्तांनी दिवाळखोरी जाहीर करुन पालिका मुख्यालयाबाहेर “आपण नागरी सुविधा पुरविण्यास सक्षम नाही” असे फलक लावावेत; अन्यथा आपण असे फलक लावू, असा इशारा शानू पठाण यांनी दिला. त्यावर महापौर नरेश म्हस्के यांनी शौचालयांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आधी मंजूर केलेला 10 कोटींचा निधी प्रभाग निहाग वाटून त्याच्या निविदा काढाव्यात असे आदेश दिले. 


          दरम्यान, सकाळी 11.30 वाजता सुरु झालेल्या या विषयावरील चर्चेचा समारोप 3 वाजता झाला. सभागृहात उपस्थित असलेल्या जवळपास सर्वच नगरसेवकांनी या मुद्यावर प्रशासनावर टीकेची झोड उठविली

Post a Comment

0 Comments