डोंबिवली तील दुय्यम निबंधक कार्यालये गेल्या तीन दिवसां पासून बंद.


डोंबिवली ( शंकर जाधव )  निवासी सदनिका, व्यापारी गाळे, भूखंड इत्यादी मालमत्ता नोंदणी करणारी डोंबिवलीतील दोन कार्यालये गेल्या तीन दिवसांपासून  बीएसएल नेट लाईन मध्ये बिघाड झाल्यामुळे बंद आहेत. यामुळे अनेक नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. डोंबिवलीतील या कल्याण ३ व ४ दुय्यम निबंधक कार्यालयातील काम ठप्प झाल्याने  शनिवारी ( चवथा शनिवार ) त्यानंतर रविवार येत असल्याने सलग पाच दिवस ही कार्यालये बंद राहणार आहेत. 


          डोंबिवली परिसरात नवीन बांधकाम संकुले निर्माण होत आहेत. त्याच प्रमाणे जुन्या घरांचे रिसेल कारारनामे मोठ्या प्रमाणात रोज होत असतात. साधारण अंदाजे डोंबिवलीतील या दोन कार्यालयातून दरदिवशी रोज अंदाजे पाच कोटी पेक्षा अधिक रक्कम मुद्रांक व नोंदणी (रजिस्ट्रेशन) द्वारे शासनाला मिळत असते. सद्या फक्त डोंबिवलीतील कार्यालयातील बीएसएनएल  नेट सेवेत बिघाड झाला आहे. असा बिघाड किंवा सर्व्हर डाऊन होणे असे प्रकार अधून मधून नेहमी होत आहेत.


           इतर महाराष्ट्रात कल्याण सहित निबंधक कार्यालये चालू आहेत. डोंबिवलीतच हा नेट मधील बिघाड झाल्याने मालमत्ता व्यवहारासाठी महाराष्ट्रातील इतर ठिकाणाहून डोंबिवलीत आलेले नागरिक  थांबून राहिले आहेत. एकतर शासनाला एकूण खरेदी रक्कमेचा पाच ते सहा टक्के स्टॅम्प ड्युटी व एक टक्का नोंदणी फी भरायची त्याबदल्यात अशा प्रकारचा नाहक त्रास सहन नागरीकांना करावा लागत आहे.  शिवाय नोंदणी न झाल्याने पुढील व्यवहार म्हणजे जागेचा ताबा, मिळणारी रक्कम इत्यादी महत्त्वाचे व्यवहार होत नाहीत. 


          येथील वारंवार नेट बिघाड व इतर तक्रारी याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांचाकडे सामाजिक माध्यमाद्वारे करून यात लक्ष घालण्याची विनंती अनेक जणांतर्फे करण्यात आली आहे. स्थानिक खासदार, आमदार यांनीही यात लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments