मोदींनी महिलांना पुन्हा चूल पेटवण्यास मजबूर केले काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांची टीका महिला कांग्रेसचे महागाई विरोधात धरणे आंदोलन


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : महागाईचा सर्वात जास्त फटका महिलांना बसला आहे, अन्न धान्यासोबातच गॅस सिलेंडरचे भाव भरमसाठ वाढल्याने पुन्हा महिलांना धूर खाण्यास मजबूर केले असून उज्जवला योजना ही महागाईमुळे मागे पडली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४० टक्के महिलांना पुन्हा चूल पेटवण्यास मजबूर केली असल्याची टीका काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी केली. 

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संजय दत्त यांच्या आदेशा नुसार कल्याण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कल्याण डोंबिवली महिला काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या महागाईच्या निषेधार्थ मोदी सरकारच्या विरोधात जनजागरण अभियान अंतर्गत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी वाढत्या महागाईच्या निषेधार्थ मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.



पत्रकारांशी बोलताना महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी सांगितले की गोरगरीब जनतेला खोटी प्रलोभने देऊन मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल आणि घरगुती गॅस यांच्या किमतीत झपाट्याने भरमसाठ वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. ह्या किमतीत अशीच वाढ होत राहिली तर गोरगरीब जनतेचे जगणे मुश्किल होणार आहे. केंद्र सरकारने त्वरित पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल आणि घरगुती गॅस यांच्या किमती कमी कराव्यात त्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात जनजागरण अभियान चालू करण्यात आले आहे.


 

देशात वाढलेल्या पेट्रोल, डीसेल, खाद्यतेल, अन्नधान्य आणि गस सिलेंडर यांचे वाढलेल्या भावा संदर्भात महिला कॉंग्रेसतर्फे आजचे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. रविवारी कल्याणमध्ये देखील पदयात्रा होती. या पदयात्रेला जनतेने प्रतिसाद दिला असून मोदी सरकारविषयी असलेला रोष दिसून आला. सर्वसामान्यांचा आवाज मोदी सरकार पर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत आंदोलन हे सुरु राहणार असल्याचे कॉंग्रेस कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले.


या आंदोलनामध्ये महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस आणि कल्याण जिल्हा प्रभारी नीता त्रिवेदी, जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष मनिष देसले, ब्लॉक अध्यक्ष एकनाथ म्हात्रे, विमल ठक्कर, शकील खान, अजय पोळकर, शबाना शेख, वैशाली वाघ, वर्षा गुजर, शिला भोसले, सुरेखा ठाकूर, दीप्ती दोषी आदी कल्याण डोंबिवली काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments