ब्रॅण्डची डिजिटल उपस्थिती वाढवण्या - साठीचे ५ उपाय■एखादी कंपनी आपल्या उत्पादनांमध्ये सर्व प्रकारची तंत्रज्ञानात्मक प्रगती आणू शकते, पण या ब्रॅण्डला डिजिटल उपस्थिती नसेल तर हे सगळे व्यर्थ आहे. लोकांना उत्पादनाबद्दल माहिती होईल तेव्हाच ते त्याचा वापर करतील, म्हणूनच तुमच्या उत्पादनांबद्दल सर्वांना माहिती देण्यासाठी विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करणे आवश्यक आहे. तुमच्या ब्रॅण्डची डिजिटल माध्यमांतील उपस्थिती वाढवण्यासाठी कोणते उपाय करता येतील याबद्दल सांगताहेत एंजेल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी.


     तुमचा ग्राहकवर्ग ओळखा: डिजिटल मार्केटिंग किंवा जाहिरात धोरण तयार करण्यापूर्वी तुमचा लक्ष्य ग्राहकवर्ग निश्चित करा. तुम्हाला प्लॅटफॉर्मवर किती संसाधने वापरणे गरजेचे आहे हे निश्चित करण्यासाठी ग्राहकवर्ग ओळखणे उपयुक्त ठरेल. उदाहरणार्थ, तुमच्या उत्पादनाच्या लक्ष्यस्थानी जेनझेड आणि मिलेनिअल्स असतील, तर तुमच्या ब्रॅण्डिंगमध्ये डिजिटल माध्यमांवरील खर्चाचा वाटा सर्वाधिक असेल. टेक-सॅव्ही पिढ्या त्यांचा बहुतांश वेळ फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर घालवतात. ते बातम्या व संशोधनासाठीही डिजिटल माध्यमांवर अवलंबून असतात.


     ब्रॅण्डिंग वेबसाइट: आपल्या कंपनीची इत्यंभूत माहिती देण्याकरिता वेबसाईट डेव्हलप करणे महत्वाचे असते. याकरिता वेबसाइट फार जटील असता कामा नये; अन्यथा लोक ती सोडून दुसरीकडे जातात. तुमचा ब्रॅण्ड नेमका काय आहे हे वेबसाइटच्या माध्यमातून सांगितले गेले पाहिजे. तुमची कंपनी विशिष्ट ग्राहकवर्गाच्या मागण्या पूर्ण करणारी असेल तर ब्रॅण्ड तरुण व नवोन्मेषकारी आहे हे वेबसाइटच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचले पाहिजे.


   सोशल मीडिया धोरण: तुमच्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे सोशल मीडिया होय. ब्रॅण्डबद्दल अधिक जाणून घेण्यासाठीही ते सोशल मीडियावर विश्वास टाकतात. म्हणूनच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील उपस्थिती कायम राखण्यासाठी तुम्हाला लोकांच्या शंकांना उत्तरे द्यावी लागतील, त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे लागेल. याशिवाय तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना यात आणू शकता व त्यांच्या माध्यमातून तुमच्या उत्पादनांबद्दल अधिक जागरूकता निर्माण करू शकता.


      आशयाबद्दलचे धोरण: जेव्हा ब्रॅण्ड पोझिशनिंगची वेळ येते तेव्हा तुम्हाला केवळ वेबसाइट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अवलंबून राहून चालत नाही. तुमच्या सर्व माध्यमांसाठी तुमचे कंटेण्ट धोरण विकसित करावे लागते. तुम्ही तुमच्या ब्रॅण्डच्या कथेचे लेखक असता आणि तुम्हाला ती प्रत्येक प्लॅटफॉर्मवर अत्यंत आकर्षक पद्धतीने सांगायची असते. यामध्ये आघाडीच्या व्यवस्थापकांनी लिहिलेल्या वैचारिक नेतृत्वाविषयीच्या लेखांचा समावेश असू शकतो. पॉडकास्ट आणि वेबिनारमधील ऑनलाइन उपस्थितीचा समावेश असू शकतो. या प्रयत्नांमुळे लोकांना तुमच्या ब्रॅण्डबद्दल व त्याच्या उत्पादनांबद्दल तसेच एकूण उद्योगाबद्दल माहिती मिळते.


      प्रतिसादक्षम राहा: डिजिटल प्रेझेन्सचा अत्यावश्यक भाग म्हणजे तुम्ही लोकांपर्यंत किती पोहोचू शकता. तुमच्या क्लाएंट्सना तुमच्यापर्यंत पोहोचणे सोपे गेले पाहिजे. त्यांनी तुमच्या वेबसाइटवर मेल, मेसेज पाठवून किंवा सोशल मीडियावरील कमेंट किंवा पोस्ट यांच्याद्वारे तुम्हाला संपर्क केला, तुम्ही त्याला उत्तर दिलेच पाहिजे. एक डिजिटल-सॅव्ही ब्रॅण्ड असण्याचा हा अत्यावश्यक भाग आहे. तुम्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहात आणि तुम्हाला त्यांची काळजी आहे असा विश्वास ग्राहकांना यामुळे मिळतो.


     आजच्या काळात डिजिटल प्रेझेन्स उभा करणे कठीण नाही. एका दृष्टीने ग्राहकांना काय हवे आहे हे अगदी स्पष्ट आहे. तुम्हाला तुमच्या ब्रॅण्डसाठी दमदार डिजिटल प्रेझेन्स उभा करायचा असेल, तर योग्य साधने व धोरणे यांची आवश्यकता आहे. डिजिटल युगात कोणतीही कंपनी दमदार डिजिटल मार्केटिंग धोरणांच्या माध्यमातून भक्कम ब्रॅण्ड उभा करू शकते.

Post a Comment

0 Comments