जेएसपी ट्रॉफी क्रिकेट सामन्यात अथर्व सुर्वे अर्धशतकी खेळी करत ठरला सामनावीर


अंबरनाथ, दि. २५  - अंबरनाथ येथे सुरु असलेल्या १४  वर्षांखालीलजेएसपी ट्रॉफी क्रिकेट साखळी सामन्यात श्री माँ गुरुकुल संघाच्या अथर्व अमोल सुर्वे याने नाबाद अर्धशतकी खेळी करून संघाला विजय मिळवून देत `सामनावीर' हा किताब पटकावला. श्री माँ गुरुकुल आणि अंबरनाथ क्रिकेट अॅकॅडमी यांच्यात पहिला साखळी सामना बुधवारी खेळला गेला. 


       श्री माँ गुरुकुल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली. अंबरनाथ क्रिकेट अॅकॅडमीने प्रथम फलंदाजी करताना ४० षटकांत सर्व बाद १९९  धावा केल्या. साईश ठाणगे याने ४५ चेंडूत चार षटकार आणि ६ चौकर खेचत ५० धावा केल्या. तर वंश चुंबळे याने २३ धावा केल्या.   


     या आव्हानाचा पाठलाग करताना श्री माँ गुरुकुल संघातील सलामीचे फलंदाज पार्थ देशमुख आणि ऋजुल रांजणे यांनी ५३ धावांची भक्कम भागीदारी केली. मात्र ऋजुल रांजणे बाद झाल्यानंतर श्री माँ गुरुकुल संघाची मधली फळी ढेपाळली. २७ व्या षटकांत ७ गडी बाद १२३ अशी श्री माँ गुरुकुलची धावसंख्या होती. परंतु त्यानंतर खेळावयास आलेल्या अथर्व सुर्वे याने या सामन्यात दमदार खेळी केली. 


      विजयी चौकारसह अर्धशतक पूर्ण करत अथर्वने ५२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. अथर्वने या सामन्यात ३ षटकार आणि पाच चौकर लगावले. त्याला अनिष पारछा (१७ धावा) ने चांगली साथ दिली. या जोडीने आठव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. एक विकेट राखुन श्री माँ गुरुकुलसंघाने हा सामना जिंकला. 


     अथर्व सुर्वे याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. या सामान्यात अंबरनाथ क्रिकेट अॅकॅडमी जयेश म्हसकर याने ३ गडी बाद केले. श्री माँ गुरुकुलचे मुख्य प्रशिक्षक दर्शन भोईर आणि प्रितेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व क्रिकेटचे धडे घेत आहे.

Post a Comment

0 Comments