अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणाऱ्या तरुणाला अटक

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) मानपाडा पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने एका बदमाश्याला बेड्या ठोकून गजाआड करण्यात यश मिळविले आहे. या बदमाश्याकडून तब्बल १ किलो ११७  ग्रॅम वजनाचा गांज्या हस्तगत करण्यात आला आहे.
    
         
           मुकेश मोतीराम भोपी (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून हा आरोपी कल्याण-शिळ मार्गावरील निळजे गावात राहणारा आहे. कल्याण कोर्टाने त्याला अधिक चौकशीकरिता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. डोंबिवलीत अवैधरित्या गांजा या अंमली पदार्थाची चोरी-छुपे विक्री होत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. 


          वपोनि शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अनिल भिसे यांच्या नेतृत्वाखाली सुधीर कदम, भानुदास काटकर, संजू मासाळ, अनिल घुगे, सुधाकर भोसले आणि सोपान काकड या पथकाने अंमली पदार्थाची विक्री, वाहतूक व साठा करणाऱ्या बदमाश्यांचा शोध सुरू केला. गेल्या अनेक दिवसांपासून हे पथक अंमली पदार्थांची तस्करी, वाहतूक व वितरण करणाऱ्यांच्या मागावर होते. अखेर या पथकाला यश आले. 


         गुरुवारी एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची पक्की खबर मिळताच सपोनि अनिल भिसे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने निळजे गाव परिसरात फिल्डींग लावली होती. एक इसम संशयास्पदरित्या अॅक्टीव्हा स्कुटरवरून जाताना आढळून आला. पोलिसांनी पाठलाग करून या इसमाला पकडले. झडतीदरम्यान त्याच्याकडे 1 किलो 117 ग्रॅम वजनाचा गांजा सापाडला. 


         या इसमाच्या विरोधात एनडीपीएस अॅक्ट 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) (II) (ब), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वपोनि शेखर बागडे यांनी सांगितले. अटक आरोपी मुकेश भोपी याचे निळजे गावात स्वतःचे घर असून त्याच्याकडून 75 हजार 800 रूपये किंमतीच्या गांज्यासह स्कुटर, रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. त्याने गांज्याचा साठा कोठून, कुणाकडून व कुणाला वितरित करण्यासाठी आणला याचा चौकस तपास करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments