कल्याण, कुणाल म्हात्रे : कल्याण पंचायत समिती उपसभापती निवडणुकीत शिवसेनेची सरशी झाली असून उपसभापती पदी भरत भोईर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे भाजपाला महाविकास आघाडीने झटका दिला आहे. कल्याण पंचायत समिती उपसभापती पदाची निवडणूक कल्याण पंचायत समिती इमारतीत मंगळवारी पार पडली.
या निवडणुकीत पंचायत समितीच्या पिपंरी गणातील शिवसेना सदस्य भरत भोईर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने पक्षीय बलाबल पाहता शिवसेना महाविकास आघाडीची सरशी होणार हे चित्र स्पष्ट होते.कल्याण पंचायत समिती इमारतीत उपसभापती पदाचा निवडणूक निर्णय आधिकारी कल्याण तहसीलदार विजय पाटील यांनी भरत भोईर यांचा एकमेव आलेला अर्ज वैध ठरविला दुसरा कोणत्याही सदस्यांचा अर्ज प्राप्त न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
याआधीचे उपसभापती किरण ठोंबरे यांचे सदस्य पद रद्द झाल्याने हि निवडणूक घेण्यात आली. कल्याण पंचायत समितीमध्ये भाजपा ५, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ३ सद्स्य असे पक्षीय बलाबल असुन शिवसेनेच्या अनिता वाकचौरे या सभापती पदी विराजमान असुन दोन वेळा हुलकावणी दिलेले उपसभापती पद शिवसेनेने आपल्याकडे खेचुन घेत भाजपाला सत्तेपासुन दूर ठेवत महाविकास आघाडीचा पॅटर्न राबिविला आहे.
कल्याण तालुका पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे भरत भोईर यांनी कल्याणचे तहसीलदार विजय पाटील यांच्याकडे अर्ज सादर केला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेनेचे पदाधिकारी अरविंद मोरे, माजी सभापती रमेश म्हात्रे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सचिव अभिजित दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे, काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
दरम्यान राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून आता पंचायत समितीमध्ये देखील महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व झाल्याने कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा, पायाभूत सुविधा, विकासकामे मार्गी लावणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपसभापती भरत भोईर यांनी दिली. तर याआधी दोन वेळा उपसभापती या पदाने आम्हाला हुलकावणी दिली होती. पक्षनिष्ठा न राखणाऱ्याना त्यांची जागा दाखवून दिली आहे. महाविकास आघाडीचा पॅटर्न कसा असतो हे आज भाजपाला कळाले असेल अशी प्रतिकिया शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली.
0 Comments