■मंदिर कारवाई प्रकरणी आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया...
कल्याण , कुणाल म्हात्रे : मोहने येथील गावठाणातील मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम सुरू होते. कोणतीही नोटिस न देता तोडकाम केल्याने याठिकाणी उद्रेक झाला. या ठिकाणी आठशे ते हजार अनधिकृत बांधकामे आहेत. त्यांच्यावर कारवाई न करता, मंदिराचे बांधकाम तोंडल्याने उद्रेक तर होणारच असे सडेतोड उत्तर आमदार राजू पाटील यांनी दिलं आहे. आज त्यांनी मोहने येथील तोडण्यात आलेल्या गावदेवी मंदिराच्या घटनास्थळाला भेट दिली यावेळी ते बोलत होते.
बुधवारी मोहने येथील गावदेवी मंदिरावर केडीएमसीच्या वतीने कारवाई करण्यात आली. यानंतर संतप्त झालेल्या जमावासोबत आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादात माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या कानशिलात लगावली. या नंतर हे प्रकरण चांगलेच तापले असून मुकुंद कोट यांच्यसह इतर काही जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे स्थानिक भूमिपुत्र समाजामध्ये नाराजी पसरली असून गावकऱ्यांची बाजू जाणून घेण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील हे मोहने येथे आले होते.
मनसे आमदार राजू पाटील यांनी कारवाई केलेल्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील यांनी सरकार आणि प्रशासन चालवणारे जे यांचे आका आहेत ते हिंदुत्व विसरले आहेत, हिंदूंहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आमच्या गावातील मंदिर तोडलं, अनधिकृत बांधकाम होतात त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे मात्र मंदिरावर कारवाई करतात.
कारवाईस विरोध करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करता, त्या अधिकाऱ्याने गावाची माफी मागावी, जिथे अनधिकृत बांधकाम सुरू आहेत तिथे कारवाई करायची नाही, मंदिरावर कारवाई करत असाल तर उद्रेक होणारच अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments