कल्याण , कुणाल म्हात्रे : चालू वीजबिल भरणाऱ्या कृषिपंप धारकांना वीजबिलाच्या थकबाकीत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाने महा कृषी ऊर्जा अभियानाद्वारे दिली आहे. महावितरणच्या कल्याण परिमंडलांतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील व पालघर जिल्ह्यातील ११ हजार ४०१ शेतकऱ्यांनी या अभियानात सहभाग घेतला आहे. उर्वरित १२ हजार ३९८ कृषिपंपधारकांनी या अभियानात सहभागी व्हावे व चालू वीजबिलाचा नियमित भरणा करावा, असे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी कल्याण परिमंडलातील सर्व कृषिपंप ग्राहकांना केले आहे.
या अभियानात वीजबिलांच्या वसुलीतून एकूण ६६ टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर वीज यंत्रणेच्या विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. स्वतंत्र खात्यात जमा होणाऱ्या या निधीतून नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र व क्षमतावाढ तसेच नवीन वीजजोडण्यांसह विद्युत यंत्रणेच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे.
त्यामुळे कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे. थकबाकीमुक्ती व गावातील वीजयंत्रणेचा विकास या दुहेरी फायद्यासाठी शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता औंढेकर यांनी केले आहे.
कल्याण परिमंडलात २३ हजार ७९९ कृषिपंप ग्राहक आहेत. वीजबिलाच्या मूळ थकबाकीमधील व्याज व दंड माफी तसेच निर्लेखन यानंतरच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकीही माफ करण्यात येत आहे. या अभियानात थकबाकी व चालू वीजबिलांपोटी ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग व पालघर जिल्ह्यातील ११ हजार ४०२ ग्राहकांनी ६ कोटी ६६ लाख रुपये वीजबिल भरले आहे.
यात दोन्ही जिल्ह्यातील ८ हजार १४४ कृषिपंप ग्राहक पूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरली आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्येही त्यांना सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.
https://billcal.mahadiscom.in/
0 Comments