सुभेदार वाडा शाळेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाला सी. एम. पुराणिक यांचे नाव १४ नोव्हेंबर जन्मदिनी होणार नामकरण सोहळा




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट दादर मुंबई या नामवंत संस्थेची कार्यरत असलेली कल्याण मधील शाळा म्हणजे पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा सुभेदार वाडा विद्यासंकुल येथील गुरुवर्य कै. सी. एम. पुराणिक सर यांचे नुकतेच १२ एप्रिल २०२१ रोजी दुःखद निधन झाले. त्यांचे शाळेसाठी असलेले योगदान हे वाखाणण्याजोगे होते. त्यांनी विविध भूमिका पार पाडत शाळेचा स्तर उंचावलेला आहे.


            असे हे आदर्श व्यक्तिमत्व सर्वांच्या स्मरणात राहावे व त्यांचे शाळेसाठी असलेल्या योगदानातून भावी शिक्षकांसाठी प्रेरणा मिळावी त्या प्रित्यर्थ संस्थेने त्यांचे नाव पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाला देण्याचे योजले आहे. म्हणून १४ नोव्हेंबर या त्यांच्या जन्मदिनी मुंबईतील नामवंत आर्किटेक्चर व सुभेदारवाडा शाळेच्या माजी विद्यार्थीनी साधना वैद्य यांच्याहस्ते ज.ए.इ. संचलित सुभेदार वाडा संकुल कल्याण येथे शाळेचा नामकरण सोहळा साजरा होणार आहे.


सी.एम.पुराणिक यांचा जन्म दि.१४ नोव्हेंबर १९३६ साली मालेगाव या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण त्यावेळेची अकरावी मॅट्रिक मध्ये झाले. त्यांना जून १९६० सन मुरबाड येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक या पदासाठी संधी मिळाली. एका वर्षानंतर लगेच १३ जून १९६१ मध्ये सुभेदार वाड्यात त्यांचा प्रवेश झाला. ते शिक्षक पदावर रुजू झाले. शाळेत नोकरी करत असताना त्यांनी शिक्षणचालू ठेवलं. पुढे त्यांनी सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन केले आणि त्यांना सन १९७१ मध्ये बी.एड. परीक्षेत पुणे विद्यापीठातून तृतीय क्रमांकाचे मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.


शिक्षकाची भूमिका निभावत असताना सन१९७८ मध्ये 'शिक्षकांचा संप' च्या काळात शिक्षक शिक्षकेतर कर्मचान्यांचा पगार स्थगित झाल्यामुळे त्यांनी ठाणे जिल्ह्यातून निधी गोळा करून शिक्षकांना आर्थिक मदत केली हे त्यांचे समाज कार्य मोलाचे ठरले. विद्यार्थ्यांना व्यवसायासंबंधीचे मार्गदर्शन करून व्यवसायासाठी प्रोत्साहित केले. सन १९८१- ८२ मध्ये त्यांच्या आग्रहास्तव पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागाची सुरुवात करण्यात आली. तसेच सेमी इंग्रजी शिक्षण सुरू कराव असाही त्यांचा आग्रह होता. त्यानुसार सन १९९८ -९९ मध्ये सेमी इंग्रजीस सुरुवात झाली.


सन १९९० साली शाळेचे शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्ताने त्यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ महाविद्यालय व MCvc विभागाची स्थापना करण्यात आली. त्यांनी शताब्दी वर्ष स्मरणिका निर्माण प्रक्रियेत आदर्श स्मरणिकेचे कुशल संपादन केले. सुभेदार वाडा शाळेत पर्यवेक्षक म्हणून कारभार स्वीकारलेला होता. शाळेचा व्याप सांभाळत असताना सरांचा संस्थेतही मोठा सहभाग होता. संस्थेचे असलेले स्वतंत्र 'करंट फंड ट्रेझररपद त्यांनी भूषवले. त्यांची संस्थेच्या शिक्षक संघ कार्यकारणी मध्ये 'शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवड झाली.


संस्थेच्या कोषाध्यक्ष पदाचाकारभार त्यांनी यशस्वीपणे सांभाळला. संस्थेच्या विविध शाळांमधील शालांत परीक्षार्थीना मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन त्यांनी केले. "आठवडी सराव परीक्षा" हा उपक्रम त्यांनी सुरु केला व तो सातत्याने सुरू आहे. संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे कुशल नेतृत्व त्यांनी गाजवले. कल्याण येथील याज्ञवल्क संस्थेत गेले दहा वर्ष विश्वस्त म्हणून कार्यरत होते. दि.३० नोव्हेंबर १९९४ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

Post a Comment

0 Comments