गोविंदवाडी परिसरातील पूरग्रस्त अद्यापही मदती पासून वंचित

■कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागातर्फे तहसीलदारां कडे मदतीची मागणी  


कल्याण , कुणाल म्हात्रे  :  जुलै महिन्यात आलेल्या पुरामुळे कल्याण तालुक्यातील विविध भागांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. या पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. असाच पुराचा फटका कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरातील नागरिकांना बसला होता. यातील अनेक नागरिक हे सरकारी मदतीपासून अद्यापही वंचित असून याबाबत कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने आवाज उठवला असून अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्षा शिफा मेशहर यांनी तहसीलदार कार्यालयावर पूरग्रस्त महिलांसह धडक दिली. यावेळी जे पूरग्रस्त या सरकारी मदतीपासून वंचित आहेत त्यांना त्वरित मदत देण्याची मागणी केली.


        २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण तालुक्यात देखील महापुराने थैमान घातले होते. यात अनेक सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांच्या घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले. कल्याण पश्चिमेतील खाडी किनारी असलेली गोविंदवाडी भागात देखील पुराचे पाणी शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले. याठिकाणी तहसीलदार कार्यालयामार्फत पंचनामे करत काही जणांना मदत देखील देण्यात आली. मात्र सुमारे १५० ते २०० पूरग्रस्त नागरिक शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत.


     या पंचनाम्यासाठी जेव्हा तलाठी येतात तेव्हा मोजक्याच जणांना मदतीचे फॉर्म देतात. तसेच काही नागरिक कामधंद्यामुळे घरी उपलब्ध नसल्याने त्यांचा पंचनामा अद्याप होऊ शकला नाही. त्यामुळे जे पूरग्रस्त नागरिक या मदतीपासून वंचित आहेत त्यांचा पंचनामा करून शासनाने तातडीने या नागरिकांना मदत द्यावी यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले असल्याची माहिती कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षा शिफा मशेहर यांनी दिली.      

Post a Comment

0 Comments