सत्ताधारी पक्षाला निवडणुक समोर ठेवून बीएसयुपी प्रकल्पातील लाभार्थ्यांची आठवण भाजपचा आरोप


डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने केंद्र सरकारच्या बीएसयूपी प्रकल्प सुरु होऊन अनेक वर्ष उलटले. मात्र आजही अनेक लाभार्थौ या प्रकल्पातील लाभार्थी  घरापासून वंचित राहिले आहेत.पालिकेवर अनेक वर्ष शिवसेनेचा महापौर असूनही पालिका प्रशासन लाभार्थ्यांना घरे देण्यास का कमी पडली याचे उत्तर नाही.पालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने शिवसेनेने लाभार्थ्यांसाठी उपोषणाचा इशारा दिला होता.यावर भाजपने सत्ताधारी पक्षाला निवडणुक समोर ठेवून बीएसयुपी प्रकल्पातील लाभार्थ्यांची आठवण येत असल्याचा आरोप केला आहे.


     डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर परिसरातील बीएसयुपी प्रकल्पातील अनेक लाभार्थ्यांना घरे मिळाली नसल्याने शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु पालिका प्रशासने १५ दिवसात बैठक घेऊन निर्णय घेऊ असे लेखी आश्वासन दिल्यावर मोरे यांनी उपोषण मागे घेतले.यासंदर्भात भाजप डोंबिवली पूर्व मंडल शहर सचिव मनोज पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.ते म्हणाले,पालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक असल्याने शिवसेनेला अचानक लाभार्थ्यांची आठवण आली.लाभार्थी इतके दिवस घरापासून वंचित होते तेव्हा शिवसेनेने का आवाज उठवला नाही ? 


      उपोषणाची हाक द्यायची आणि पालिकेने आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घ्यायचे हे न समजण्याइतके नागरिक भोळे नाहीत.लाभार्थ्यांना घरे मिळणे आवश्यक आहे. मात्र त्यात राजकारण आणता कामा नये.या लाभार्थ्यांना घरे लवकरात लवकर मिळावे यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.या लाभार्थ्यांना घरे मिळाली नाही तर  उग्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments