तरुणीच्या विनय भंगा प्रकरणी भाजपा नगरसेवकाला ३ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  एका तरुणीला चेहऱ्यावर ऍसिड टाकण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग करणाऱ्या भाजपाच्या माजी नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर याच्या विरोधात सप्टेंबर महिन्यात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल अडीच महिन्यांनी फरार आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. २०१९ ते ६ सप्टेंबर २०२१ या दोन वर्षांपासून आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकर कल्याणच्या अनेक रस्त्यांवर अडवून पीडित तरुणीला त्रास देत होता. 


            तो वेळोवेळी तिचा चारचाकी वाहनाने पाठलाग करून तिची समाजात व नातेवाईकात बदनामी करण्याची धमकी देत होता. तसेच तिच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकून चेहरा खराब करीन, तुला सोडणार नसून तिला व तिच्या मित्र परिवारास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केल्याचा आरोप पीडित तरुणीने तिच्या फिर्यादीत केला होता. तसेच तिच्या जुन्या इंस्टाग्राम अकाउंटवर अश्लिल मेसेज व फोटो टाकून सोशल अकाउंट आणि व्हाट्सअपवर बदनामी केली असल्याचा आरोपही पीडित महिलेने आपल्या फिर्यादीत नमूद केला होता. 


          “या प्रकरणी हायकोर्टात जामीन मिळण्यासाठी आरोपीने अर्ज दाखल केला होता. मात्र हाय कोर्टाने जामीन  नामंजूर केल्याने अखेर सोमवारी फरार असलेला आरोपी संदीप गायकर स्वतः बाजारपेठ पोलिसांत हजर झाला. यावेळी पोलिसांनी त्याला अटक करून मंगळवारी दुपारी कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने सुनवाणी देत ३ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे फिर्यादीच्या वकील क्रांती रोठे यांनी सांगितले”.

Post a Comment

0 Comments