स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या दोन इनडोअर खेळपट्ट्या सरावासाठी झाल्या खुल्या


ठाणे , प्रतिनिधी : जागतिक तापमानातील बदलामुळे पावसाचे चक्र बदलेल आहे. त्यामुळे क्रिकेटच्या सरावात सातत्य राखण्यासाठी इनडोअर महत्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी केले. ठाण्याच्या क्रिकेटसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या स्पोर्टिंग क्लब कमिटीने तयार केलेल्या दोन इनडोअर खेळपट्ट्यांचे उदघाटन डॉ. विजय पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. 


         यावेळी स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष डॉ राजेश मढवी, मुंबई क्रिकेट संघटना आणि यजमान संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, आगामी काळात ऋतुचक्रातील बदल क्रिकेटच्या सरावात अडथळे आणू शकतात. अनियमित पावसामुळे प्रत्यक्ष मैदानावर सराव करण्यास मज्जाव होऊ शकतो. त्यामुळे सरावात व्यत्यय न येण्यासाठी इनडोअर खेळपट्ट्या क्रिकेटपटूंना फायदेशीर ठरतील. 


         तर क्रिकेटपटूंना १६ मैदानी आणि दोन इनडोअर खेळपट्ट्या सरावासाठी उपलब्ध करुन देणारी  स्पोर्टिंग क्लब कमिटी ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था असल्याचे सांगून क्रिकेट अंपायर प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने परवानगी देण्याची मागणी डॉ. राजेश मढवी यांनी मुंबई क्रिकेट संघटनेकडे केली. येत्या काही दिवसात इनडोअर खेळपट्ट्यावर सराव करण्यासाठी अत्याधुनिक अशा दोन बॉलिंग मशिन उपलब्ध करणार असल्याचे डॉ मढवी यांनी सांगितले.           या उदघाटन कार्यक्रमला मुंबई क्रिकेट संघटनेचे सहसचिव शाह आलम, खजिनदार जगदीश आचरेकर, कार्यकारिणी सदस्य उन्मेष खानविलकर, अभय हडप, नदीम मेमन, कौशिक गोडबोले, अजिंक्य नाईक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments