जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांचा आढावा आगामी आर्थिक वर्षाचा आराखडा विभागांनी तातडीने सादर करण्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना



ठाणे, दि. १५ (जिमाका) :  जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून  जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव अशी मदत केली जाते. त्याद्वारे ग्रामीण भागातील सुविधांचे बळकटीकरण करून नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या निधीतून पुढील आर्थिक वर्षांत करावयाच्या कामांचा आराखडा विविध विभागांनी तातडीने सादर करावा, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी आज येथे दिल्या.


         जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनच्या समिती सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०२२-२३ साठी आराखडे अंतिम करणे आणि यावर्षातील योजनानिहाय कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, सहायक नियोजन अधिकारी निवेदिता पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 


          यावेळी विभागनिहाय योजना, अंदाजपत्रक, तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता याबाबत आढावा घेण्यात आला. विभागांना वर्ग केलेला निधी पुढील चार महिन्यात खर्च करण्यात यावा त्यासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत परिपूर्ण मान्यतांचे प्रस्ताव नियोजन विभागाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी दिल्या.


         जिल्ह्यातील वन पर्यटनाला चालना देण्यासाठी वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांची भूमिका महत्वाची असून पुढील वर्षांपासून वन पर्यटनाच्या नकाशावर ठाणे जिल्ह्याचे नाव येण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन श्री. जाधव यांनी केले. 


         यावेळी कृषी, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, शिक्षण, उर्जा, आरोग्य आदी विभागांच्या महत्वपूर्ण योजना आणि त्यासाठी उपलब्ध असलेला निधी याबाबत चर्चा करण्यात आली. वितरीत करण्यात आलेला निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.


            ग्रामीण भागातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे बळकटीकरण करून सामान्यांना नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न करावेत. आरोग्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही श्री. जाधव यांनी दिली.

Post a Comment

0 Comments