कोरोनामुळे डोंबिवलीच्या दिवाळी पहाट यावर्षीही रद्द... पोलिसांचे फ्लेक्स - बॅनर्सद्वारे आवाहन
डोंबिवली (  शंकर जाधव ) कोरोनामुळे डोंबिवलीच्या दिवाळी पहाट कार्यक्रमांवर यंदा सलग दुसऱ्या वर्षी  रद्द करण्यात आला आहे. अभ्यंगस्नान करून दिवाळीचा पहिला मंगलमय दिवस डोंबिवली पूर्वेकडील फडके रस्त्यावर पहाटे साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा यंदा देखिल करोना संसर्गाच्या भीतीने खंडित होणार आहे. श्री गणेश मंदिर संस्थानचे ग्रामदैवत गणपती मंदिर खुले राहणार आहे. तर दिवाळीत नागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठेत वाढत असलेली नागरिकांनी गर्दी पाहता फडके रोडवर गर्दी करू नये, असे आवाहन करणारे फ्लेक्स-बॅनर्स पोलिसांनी लावले आहेत.

  
         दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अभ्यंगस्नान करून, नवीन कपडे परिधान करून हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणींसह ज्येष्ठ मंडळीही श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी फडके रस्त्यावर जमतात. मागील अनेक वर्षांपासूनची ही परंपरा म्हणजे डोंबिवलीचा एक उत्सवच मानला जातो. याच फडके रोडवर कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या ठाणे, मुंबई, कर्जत-कसाऱ्यापासून दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी तरुणाई अवतरत असते. 


         फडके रस्त्यासह आजूबाजूचे गल्लीबोळ वाहनांसह तरुण-तरुणींच्या गर्दीने फुलून जातात. तरुण-तरुणी पारंपरिक वेश परिधान करून नटूनथटून येतात. प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना दीपावली व नववर्षाच्या शुभेच्छा देतो. तरुण-तरुणींच्या अलोट गर्दीने गणेश मंदिर परिसरातील चारही बाजूंचे रस्ते फुलून जातात. 


            पारंपरिक पेहरावात पूर्वेतील फडके रोडवर उसळणारी तरुणाई, त्यांच्यासाठी आयोजित केलेले गीत संगीत-नृत्याचे कार्यक्रम आणि ठिकठिकाणची नाट्यगृहे, सभागृहांत रंगलेल्या दिवाळी पहाटेच्या मैफली अशा सांस्कृतिक वातावरणात दिवाळीचे स्वागत कल्याण-डोंबिवलीत करण्यात येते.           वाद्यवृंद, गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम अशी भरगच्च मेजवानी दिवाळी पहाटनिमित्त श्री गणेश मंदिर संस्थानसह अन्य सामाजिक संस्थांतर्फे फडके रोडवर दिली जाते. पहाटे साडेचार-पाच वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत दिवाळी उत्साहाचा माहोल फडके रोडवर पाहण्यास मिळतो. 


          परंतु गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही करोनाच्या संसर्गाने मंदिर संस्थानने एकही कार्यक्रम आयोजित केला नाही. फडके रोडच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाश्यांनी दिवाळीच्या दिवसापुरता या भागात जमावबंदी आदेश पोलिसांनी लागू करावा, अशी मागणी यंदाही केली आहे.


             या पार्श्वभूमीवर पूर्व उपप्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, आणि डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त जय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फडके रोड, इंदिरा चौक परिसरात फ्लेक्स-बॅनर्स लावण्यात आले आहेत. सर्वजण कोव्हीड - 19 चा समर्थपणे मुकाबला करत दैनंदीन जीवन जगत आहेत.           दिवाळी पहाटच्या निमित्ताने फडके रोडवर कोणतेही सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. दिपावलीपूर्वी खरेदीसाठी, तसेच दिपावलीच्या दिवशी नेहरु रोड, फडके रोडसह शहराच्या अन्य ठिकाणी एकत्रपणे गर्दी करुन जमू नका, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरा, सामाजिक अंतर राखुन रोगाचा प्रादुर्भाव टाळा, असे आवाहन या फ्लेक्स-बॅनर्सवर करण्यात आले आहे.


           ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त जयजित सिंग यांच्या आदेशानुसार आयुक्तालय परिसरात सीआरपीसी क 144 प्रमाणे लागू असून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाचे उलंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही या फलकामार्फत देण्यात आला आहे. यंदाचा दिवाळी सण सर्वांनी कोव्हीड 19 च्या नियमांचे पालन करुन पोलिसांना सहकार्य करा, असेही आवाहन करण्यात आले आहे.


सावित्रीबाई फुले कलामंदिरा 
मनसेचा दिवाळी पहाट कार्यक्रम 


डोंबिवलीची सांस्कृतीक परंपरा जपण्यासाठी मनसेतर्फे याच फडके रोडला दिवाळी पहाटचा कार्यक्रम करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने हा कार्यक्रम सावित्रीबाई कलामंदिरात होणार असल्याचे मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी सांगितले.


डोंबिवलीकरांसाठी उत्सव प्रकाशाचा 
            मंगळवारी सायंकाळी ६  वाजता मनसे नेते तथा आमदार प्रमोद (राजू )  पाटील यांच्या हस्ते उत्सव प्रकाशाचा या विद्युत रोषणाई कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. डोंबिवली शहर मध्यवर्ती कार्यालयाशेजारील अप्पा दातार चौक परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.


दिवाळी पहाटेला शास्त्रीय गायन 
          मनसेतर्फे सावित्रीबाई फुले कलामंदिरात गुरुवारी सकाळी ७  वाजता आयोजित करण्यात येणाऱ्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात ज्येष्ठ व सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या शास्त्रीय गायनाचा सदर कार्यक्रम होणार आहे.

  

Post a Comment

0 Comments