कोरोनावर कॅप्सूलने होणार उपचार, ट्रायलचा तिसरा टप्पा पूर्ण


■ऑप्टिमस फार्माची माहिती; 'मोलनुपिरावीर'चे संशोधन पूर्ण ~


मुंबई, ९ नोव्हेंबर २०२१: आता कोरोना व्हायरसवर कॅप्सूलने उपचार केले जाणार आहेत. याच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. औषध निर्माता ऑप्टिमस फार्माने सांगितलं की, त्यांनी भारतात कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी मोलनुपिरावीर ओरल कॅप्सूलची तिसऱ्या फेज क्लिनिकल चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

 

       सीडीएससीओ, डीजीएचएस, भारतीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाच्या विषयतज्ज्ञ समितीच्या (एसईसी) शिफारशींनंतर १८ मे, २०२१ रोजी ऑप्टिमसला भारतीय औषध महानियंत्रकांकडून (डीजीसीआय) चाचण्या घेण्याची परवानगी मिळाली होती. पाचव्या दिवसाच्या अभ्यासानुसार, उपचारातील ७८.४ टक्के रुग्णांचे आरटीपीसीआर निगेटिव्ह आढळले, तर प्लेसिबो गटात ४८.२ टक्के रुग्ण आढळलेत.


        या प्रकरणी सल्लागार समितीची ३० नोव्हेंबरला बैठक होणार आहे. ज्यामध्ये मर्क आणि रिजबॅकच्या सौम्य ते मध्यम कोविड संसर्गाच्या उपचारांसाठी मोलनुपिरावीरच्या आपत्कालीन मंजुरीसाठी केलेल्या विनंतीचा विचार केला जाईल. त्याचप्रमाणे, उपचार घेत असलेल्या लोकांमध्ये अभ्यासाच्या १० व्या दिवशी ९१.५ टक्के आरटीपीसीआर निगेटिव्ह नोंदवण्यात आले आहेत.


     ऑप्टिमस फार्माचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी. श्रीनिवास रेड्डी म्हणाले, "कोविड-१९ साठी अत्याधुनिक आणि फायदेशीर उपचार पर्याय विकसित करणं आणि कमीत कमी वेळेत रोगाचा प्रतिबंध करणं हे आमचे उद्दिष्ट आहे. केंद्रीय परवाना प्राधिकरणासमोर फेज 3 क्लिनिकल चाचण्या सादर करणारी ऑप्टिमस ही पहिली फार्मा कंपनी आहे. 


      देशातील २९ वेगवेगळ्या ठिकाणी या औषधाचा अभ्यास करण्यात आला. इतर सामान्य उपचार पर्यायांच्या तुलनेत मोलनुपिरावीरचे श्रेष्ठत्व सिद्ध करणे इतकेच नव्हे तर भारतभरातील वैविध्यपूर्ण जनुकीय संग्रहामध्ये या औषधाचा प्रभावीपणा दाखवून देणे, हाही या चाचण्यांमागील हेतू होता.”


       SARS-CoV-2 संसर्गाच्या सर्वांगीण उपचारांत राष्ट्राच्या अपुऱ्या वैद्यकीय गरजांच्या पूर्ततेसाठी मोलनुपिरावीरचे उत्पादन आणि वितरण सुव्यवस्थित आणि प्रभावी पद्धतीने करण्यासाठी ऑप्टिमस पूर्णपणे सज्ज झाली आहे.

Post a Comment

0 Comments