केडीएमसीच्या आश्वासना नंतर आजींचे उपोषण मागे

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण पश्चिमेकडे कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह उद्यान स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत बाधित होणार होते. सदर उद्यानासह स्मारक वाचविण्यासाठी त्याच ठिकाणी लक्ष्मीबाई मारुती ससाणे या 85 वर्षीय आजीबाईंनी शुक्रवारी सुरू केलेले उपोषण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या लेखी आश्वासनानंतर शनिवारी संध्याकाळी मागे घेतले.

      
            या पार्श्वभूमीवर कल्याण जिल्हा न्यायालयातील वकील संघटनेचे उपाध्यक्षा अॅड. माया गायकवाड अॅड. प्रकाश जगताप यांच्यासह मनीषा धिवरे, के. डी. तायडे, अॅड. कैलास जाधव, अॅड. डी. बी. वानखेडे आदी वकील मंडळींनी आजींना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या उपोषणाला जाहीर पाठींबा दिला. याच दरम्यान केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी आजींना उपोषण मागे घेण्यासाठी लेखी पत्राद्वारे गळ घातली. 


            स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत प्रस्तावित कल्याण स्टेशन सुधारण प्रकल्पा अंतर्गत प्रस्तावित उड्डाणपूल व वाहतुकीचे नियोजनाच्या अनुषंगाने मंजुर विकास योजनेतील रस्त्याची प्रस्तावित रुंदी वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे महात्मा फुले चौक ते सुभाष चौक पर्यंतच्या 24 मीटर रुंद रस्ता असून सदर रस्त्यास दोन्ही बाजूस 3 मीटर एवढे रुंदीकरण करुन 30 मीटर रुंदीचा करण्याची कार्यवाही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 2010 अन्वये प्रस्तावित केला आहे. 


             डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुध्द यांचे पुतळे रस्त्यामध्ये बाधीत होत नाही. तसेच जर उद्यानाची जागा बाधित होत असेल, तर आपणास मागील भुखंडाच्या जागेवर जेवढी जागा बाधित झालेली आहे तेवढीच जागा देऊन सदर उद्यान महापालिके कडून विकसित करण्यात येईल, असे केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी या आजींना लेखी आश्वासन दिले. त्यामुळे आजींनी शुक्रवारपासून सुरू केलेले उपोषण शनिवारी संध्याकाळी मागे घेतले.

Post a Comment

0 Comments