ब्रह्मांड कट्टयावर "वास्तुशास्त्र व ब्रह्मांड लहरी" वास्तुविशारद डाॅ.अनिल भिवंडीकर यांचा कार्यक्रम संपन्न झाला


ठाणे, प्रतिनिधी  : मनुष्य प्राणी हा कोणत्या ना कोणत्या वास्तुमधे वास्तव्य करीत असतो, राहते घर,कामाचे ठिकाण, कार्यालय इत्यादी. पृथ्वी भोवती असणार्या चुंबकीय ऊर्जेच्या क्षेत्रामधून चुंबकीय शक्ती आपल्या देहा पर्य॔त भोवतालच्या वास्तुच्या माध्यमातून येते. अशावेळी वास्तु निसर्गाशी योग्य संतुलन साधणारी असल्यास मन,शरीर,विचार,वर्तन याच्यावर त्याचा योग्य तो परिणाम होतो.अन्यथा त्रास होतो. 


        या साठी वास्तु रचना कशी असावी हे सांगणारे शास्त्र म्हणजे 'वास्तुशास्त्र'. या वास्तुशास्त्र बाबत माहिती घेण्यासाठी दिनांक २१ नोव्हेंबर २०२१रोजी ब्रह्मांड कट्ट्यावर डाॅ अनिल यशवंत भिवंडीकर, गोल्ड मेडलिस्ट ,डी.लीट.(पारंपारिक भारतीय वास्तुशास्त्र) यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ब्रह्मांड कट्ट्याचे अध्यक्ष महेश जोशी यांनी ही मुलाखत घेतली तर संस्थापक श्री.राजेश जाधव यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत केले.

           

          डाॅ. अनिल भिवंडीकर हे वास्तुशास्त्र मार्गदर्शक, ऑस्ट्रो वैदिक वास्तुशास्त्र सल्लागार, न्युमरोलाॅजिस्ट व फेंगशुई सल्लागार, इंडस्ट्रीयल वास्तुतज्ञ आहेत. इन्स्टिटय़ूट ऑफ वैदिक वास्तुशास्त्र, वास्तुशास्त्र रिसर्च ब्युरो,कल्याण, जि.ठाणे या संस्थेचे ते संपादक आहेत. सन१९८९ वास्तुशास्त्र या विषयावर अभ्यास करीत आहेत. शैक्षणिक दृष्ट्या ते मॅकॅनीकल इंजिनिअर असून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज मधे कार्यरत होते. श्री.अनिल भिवंडीकर यांचे वडिल श्री.यशवंत भिवंडीकर ज्योतिष शास्त्रात पारंगत होते. त्यांचा सल्ला व मार्गदर्शनुसार ते वास्तुशास्त्र या विषयाकडे वळले.


या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच वास्तुशास्त्र म्हणजे काय व कसे ओळखावे या बाबत मार्गदर्शन केले.


         वास्तुदेवता व वास्तुपुरुष यांची पुजा करून वास्तुशांत करणे आवश्यक आहे तसेच वास्तुशांत कधी करावी हे विस्तृतपणे कथन केले. तसेच संपूर्ण घराची रचना,दरवाजाची रचना कशी असावी या बाबत नकाशा काढून माहिती विषद केली.मुलांचा अभ्यास, घरातील व्यक्तींचे नातेसंबंध, आर्थिक परिस्थिती,आरोग्य,उद्योग,  या सर्वांवर वास्तुशास्त्र परिणाम होत असतो. त्या बाबत कोणत्या दिशेला काय असावे किंवा नसावेत हे उदाहरणा सहित स्पष्ट केले.जेष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी वास्तुबाबत उपाय सांगितले. 


        श्री. भिवंडीकर हे फेंगशुई शास्त्र तसेच अंकशास्त्र सुध्दा पारंगत आहेत .त्या शास्त्राच्या आधारे महत्त्वपूर्ण माहितीचे आकलन ब्रह्मांड कट्ट्यावर वरील रसिकांना झाले. श्री.अनिल भिवंडीकर याची इन्स्टिटय़ूट ऑफ वैदिक वास्तुशास्त्र व वास्तुशास्त्र रिसर्च ब्युरो ही वास्तुशास्त्र विषयाची शैक्षणिक संस्था असून अनेक विद्यार्थी या संस्थेमधून शिकून स्वतंत्र व्यवसाय करीत आहेत. वास्तुशास्त्र सल्लागार म्हणज आर्थिक खर्च असे लोक मानतात. परंतु तसे नसून या विषयाचे शिक्षण घेतल्यावर फायदाच होईल असे भिवंडीकर म्हणाले.

       

            या कार्यक्रमातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मांड कट्टा अंतर्गत कलासंस्कारच्या सचिव ऋजुता देशपांडे यांनी नुकताच युरोप देशातून घेण्यात आलेल्या 'मिसेस टाॅप ऑफ द वर्ल्ड' या आंतरराष्ट्रीय विश्वसुन्दरी सौदंर्यस्पर्धेत विविध निकषांवर दमदार सादरीकरण करुन 'मिसेस टॉप ऑफ द वर्ल्ड सेकंड रनर अप २०२१' हा विजेता किताब व 'मिसेस लेडी टाॅप ऑफ द वर्ल्ड' हा किताबदेखील मिळवला . 


          लॅट्विया येथे झालेल्या ऑनलाईन स्पर्धेत विविध देशांतुन तेरा सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या . त्यामध्ये ऋजुता देशपांडे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ब्रह्मांड कट्टयावर त्यांचे श्री.अनिल भिवंडीकर व ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक श्री.राजेश जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments