पोलीस ठाण्याच्या मागणी साठी म्हारळ ग्रामस्थांचा तहसील कार्यलयावर मोर्चा


■वाढत्या गुन्हेगारीमुळे  म्हारळ गावात दहशतीचे वातावरण..


कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  कल्याण जवळच ग्रामीण भागात असलेल्या म्हारळ गावात गेल्या काही महिन्यापासून चोऱ्यागाड्याचीतोडफोडघरफोडीच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी अज्ञात तरुणां कडून १० ते १२ गाड्यांची तोडफोड करण्यात  आली होती. त्यानंतर  चार  दिवसांपूर्वी माजी सभापतींच्या घरात शिरकाव करीत अज्ञात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवत लूट केली होती. हे दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. या वाढत्या गुन्हेगारीमुळे म्हारळ गावात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 


             म्हारळ ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षापासून म्हारळ  गावात स्वतंत्र पोलीस ठाणे देण्याची मागणी केली जात होती मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने आज म्हारळ ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत मोर्चेकऱ्यांनी म्हारळ गावात स्वतंत्र पोलिस ठाणे द्यावे अशी मागणी केली.  लवकरात लवकर स्वतंत्र पोलीस स्टेशन न दिल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.


कल्याण तालुक्यातील म्हारळ गावाची लोकसंख्या लाखांच्या घरात पोहोचली आहे. हे गाव टिटवाळा पोलीस स्थानकाच्या हद्दीत येते. गेल्या काही महिन्यांपासून म्हारळ गावामध्ये घरफोडी, चोरी, लुटपाट, गाड्यांची तोडफोड अशा प्रकारचे गुन्हेगारी वाढली आहे. अनेकदा या गावांमध्ये चोरी करण्यास आलेले तरूण सीसीटीव्ही कॅमेरा देखील कैद झाले. टिटवाळा पोलिसांनी गुन्हे दाखल करत या आरोपींना अटक केली. प्रत्यक्षात टिटवाळा पोलीस ठाण्यापासून हे गाव आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हारळसह आस पासच्या गावासाठी एकच पोलीस चौकी आहे मात्र या चौकीत अवघे चार ते पाच पोलिस कर्मचारी असतात.


 अशा घटना गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घडत असल्याने  ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . वाढती लोकसंख्या व वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमीवर म्हारळ गावात पोलिस स्थानकाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


 या मागणीसाठी आज म्हारळ ग्रामस्थांनी कल्याण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. कल्याणच्या नायब तहसीलदारांना निवेदन दिले. नायब तहसीलदारांकडून पोलिस स्टेशनसाठी लवकर जागा उपलब्ध करुन दिली जाईल असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली आहे.

Post a Comment

0 Comments