अवघा संसार एक परिवार या भावनेतूनच उन्नति संभव - सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज


कल्याण,,प्रतिनिधी: ‘‘परमात्मा जर सर्वांचा आहे तर मग त्याने रचलेले हे विश्व सुद्धा आपले सर्वांचे आहे. हा परमात्मा सर्वांचा आधार आहे.  सर्वांभूती आणि सृष्टीच्या कणाकणामध्ये याचा निवास आहे. अशी भावना जेव्हा मनामध्ये अंकुरितहोते तेव्हा अन्य कोणतीही वस्तू अथवा मानवा-मानवामध्ये फरक उरत नाही. मग सर्वांचा विकास हा आपलाच विकास आहे अशी भावना उत्पन्न होते ज्यायोगे ‘अवघा संसार एक परिवार’ ही भावना  धारण केल्याने मानवतेचे उत्थान आणि उन्नती शक्य होते.’’ 


         निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी, व्हर्च्युअल रुपात आयोजित करण्यात आलेल्या 74व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या सत्संग समारोहाला संबोधित करताना वरील विचार व्यक्त केले, ज्याचा आनंद मिशनची वेबसाईट आणि साधना टी.वी.चॅनलच्या माध्यमातून विश्वभरातील निरंकारी भाविक भक्तगणांकडून तसेच प्रभूप्रेमी सज्जनांकडून घर बसल्या प्राप्त  केला जात आहे.


                सद्गुरु माताजींनी प्रतिपादन केले, की जर आपण आध्यात्मिकतेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर वास्तविक रूपात सर्वांचा आधार हा परमात्माच आहे ज्याच्यावर विश्वास ठेवणे हा भक्तिचा मूलभूत पाया आहे. म्हणूनच आपुलकीच्या भावनेने आपण एकमेकांशी सद्भावपूर्ण व्यवहार करायला हवा.  प्रत्येकाच्या प्रति मनामध्ये सदैव प्रेमाचीच भावना कायम असावी, द्वेषाची नको. जेव्हा आपण कोणासाठी काही करत असून तेव्हाही त्यामध्ये उपकाराची भावना न ठेवता सेवेचाच भाव असावा.


                ईश्वरावर विश्वास ठेवण्याची बाब आणखी स्पष्ट करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की जेव्हा आपण या परम सत्तेला ब्रह्मज्ञानाद्वारे जाणून घेतो तेव्हा मग त्याच्यावर विश्वास बसतो आणि खऱ्या अर्थाने आमची भक्ती सुदृढ होते. त्यानंतर मग जीवनात येणारे विभिन्न्‍ प्रकारचे चढ-उतार आम्हाला विचलीत करू शकत नाहीत. ही दृढता आम्हाला सत्संग, सेवा आणि नामस्मरणाच्या माध्यमातून प्राप्त होते.


              दरम्यान या अगोदर सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरु असलेल्या सत्संग समारोहामध्ये देश-विदेशातून भाग घेत असलेल्या वक्ता, गीतकार व कवी सज्जनांनी आपापली व्याख्याने, भक्तीरचना आणि कवितांच्या माध्यमातून समागमाचा मुख्य विषय ‘विश्वास, भक्ति, आनंद’यावर प्रकाश टाकला.

Post a Comment

0 Comments