भिवंडी तालुक्यातील ३४ गावांना पुरेशा पाण्याच्या आशा पल्लवीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पुढाकार
भिवंडी दि. १३ (प्रतिनिधी)  :  स्टेम प्रकल्पाद्वारे भिवंडी तालुक्यातील ३४ गावांना होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पाहणी करून उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे दिले. या गावांना सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतल्याने, काही दिवसांत पुरेसे पाणी उपलब्ध होण्याबाबत ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.


           भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील ३४ गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील, अशोक घरत, अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, स्टेम प्रकल्पाचे महाव्यवस्थापक संकेत घरत यांच्यासह ३४ गावांचे सरपंच व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


          केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले, ``स्टेम पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यापासून त्याचा विस्तार झाला नाही. आजही भिवंडी तालुक्यातील ३४ गावांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होतो. तसेच या योजनेद्वारे ३४ गावांसाठी ४१ एमएलडी पाणी आरक्षित असताना केवळ ११ एमएलडी पाणी देण्यात येते.


            हे पाणीही नियमित नसल्यामुळे या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊन महिलांना अडचणी निर्माण होतात. काही गावांना पाणीच पोचत नाही, तर काही गावांना अपुरा पाणी पुरवठा होतो. या गावांना पुरेशा प्रमाणात व योग्य दाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी स्टेम प्रकल्पाच्या महाव्यवस्थापकांनी येत्या आठ दिवसात पाहणी करून उपाययोजना कराव्यात.''


             स्टेम प्रकल्पातील ३४ गावांना अपुरा पाणी पुरवठा होत असतानाही पाणी देयके मोठ्या प्रमाणात येतात. तसेच थकीत देयकांवर व्याज लावले गेले आहे. हे व्याज माफ करण्यासंदर्भात विचार करण्यात यावा. गावापर्यंत पाणी आल्यानंतर अंतर्गत वितरणाची व्यवस्था ठाणे जिल्हा परिषदेने करावी. 


           तसेच जलजीवन मिशनमधून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देता येईल का याचाही विचार करावे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर टॅपिंग करणाऱ्यांवर कारवाई करावी. पाणी बिलावरील व्याजमाफीसाठी ग्रामपंचायतींनी पत्रे द्यावीत, कालवार व ब्राह्रण गाव येथील खदानींची पाहणी करून पाण्याची गुणवत्ता तपासणी करावी. 


             तसेच शक्य असल्यास शुद्धीकरण प्रकल्प उभारून  नवा स्त्रोत उभारण्याबाबत चाचपणी करावी, अशा सुचनाही श्री. पाटील यांनी केल्या.स्टेम कंपनीचे महाव्यवस्थापक श्री. घरत यांनी या गावांमध्ये प्रत्यक्ष पाणी करून पाणी पुरवठ्यातील अडचणी दूर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. या वेळी विविध गावांच्या सरपंच व लोकप्रतिनिधींनी पाणी मिळण्यासंदर्भातील अडचणी मांडल्या.

Post a Comment

0 Comments