कल्याण , कुणाल म्हात्रे : गेल्या दीड वर्षानंतर जिल्हा परिषद शाळेतील मुले प्रथमतःच शाळेमध्ये आलेली आहेत. या मुलांनी आपला भविष्यकाळ उज्वल करावा, शाळेचे त्याचबरोबर गावाचं नाव मोठं करावे अशा शुभेच्छा राहनाळ गावचे सरपंच राजेंद्र मढवी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना काढले. जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे ४ ऑक्टोबर पासून शासनाच्या आदेशानुसार इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी चे वर्ग सुरू करण्यात आले.
यावेळी गावचे सरपंच राजेंद्र मढवी, भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती सदस्य ललिता पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वले, ग्राम विस्तार अधिकारी अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य किरण नाईक, संदीप नाईक, पंकज पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्रमिला कडू, सदस्य प्रतिभा नाईक हे उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल व्हावा, विद्यार्थ्यांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावेत अशाही सुचना दिल्या.
शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचा थर्मामीटर, ऑक्सिजन लेवल चेक करून सॅनिटायझरने हात स्वच्छ केले. विद्यार्थ्यांचे स्वागत कंपास बॉक्स, गुलाबपुष्प, आणि चॉकलेट देऊन करण्यात आले. शाळेमध्ये सर्वत्र कोरोनाचे नियम पाळावेत, आपला अभ्यास कसा करावा यासाठी छोटे छोटे बॅनर लावण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी सर्व मान्यवरांचे, विद्यार्थ्यांचे स्वागत केले. संजय अस्वले, ललिता पाटील यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी अनघा दळवी, संध्या जगताप, रसिका पाटील, चित्रा पाटील हे शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अनघा दळवी यांनी केले.
0 Comments