सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर समुहाकडून दुर्गत्रिकुटावर चढाई

दोन वर्षांच्या चिमुकलीची विक्रमी नोंद

सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर समुहाकडून दुर्गत्रिकुटावर चढाई,क्रीडाविश्व, धम्माल,


 शहापूर । सह्याद्री पर्वत रांगेतील दुर्गत्रिकूट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि साहसी दुर्गवेड्या गिर्यारोहकांसाठी आनंदाची पर्वणी म्हणून सुपरिचित जाणाऱ्या अलंग, मदन आणि कुलंग या तिन्ही किल्ल्यांची दोन दिवसीय मोहीम सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर समूहाने यशस्वीरीत्या फत्ते केली आहे. यावेळी विशेष म्हणजे शहापुरच्या प्रचिती प्रदीप घरत या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीने या थरारक मोहिमेत सहभागी होत इतिहास रचला आहे. किल्ल्यावर  चढाई करणारी सर्वांत कमी वयाची गिर्यारोहक होण्याचा मान तिला मिळाला आहे.

       अलंग, मदन, कुलंग हे दुर्गत्रिकुट जणू काही सह्याद्रीच मुकुटच म्हणावे लागेल. वर्षभरात अनेक साहसी दुर्गप्रेमी या तिन्ही गडाच्या एकत्रित प्रस्तारोहणासाठी झाडून झटकून हजेरी लावत असतात. या किल्ल्यांपैकी अलंग व मदन गडाला वर जाण्यासाठी पायऱ्याचं उपलब्ध नसल्याने गिर्यारोहकांना दोराच्या सहाय्याने साहसी रॉक क्लाइंबिंग व रॅपलिंग चा थरारक अनुभव घेत वरचा मार्ग अवलंबावा लागतो. याशिवाय एकावेळी एकाच व्यक्तीला चढता-उतरता व उभे राहता येईल असे बिकट रस्ते व नजरेचा थरकाप उडवणाऱ्या खोल दऱ्या; सार काही साहसाची परिसीमा गाठणार असल्याने सामान्य व्यक्तीला चढवणे हे कोणत्याही गिर्यारोहक समूहासाठी आव्हानचं समजले जाते. त्यात लहान मुले सहभागी असल्यास ट्रेकर मंडळींना जीवाशी खेळ करत मोठी कसरत करावी लागते.
प्रस्तारोहणासाठी २३  ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर समूहाकडून थरारक मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी देखील या समूहाने महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ले, सुळके सर केलेले आहेत. पण यावेळी समुहाने प्रचिती प्रदीप घरत या मूळच्या शहापुर तालुक्यातील असलेल्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुलीकलीला सर करण्याचं आव्हान पेललं होत. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील आंबेवाडी गावातून सुरू झालेली अलंग व मदन गडाची मोहीम समुहाने संध्याकाळी ४ लाच फत्ते केली. प्रचिती घरत या चिमुकलीने रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग चा थरार अनुभवत अखेरीस कठीण श्रेणीतील चढाईसाठी ओळ्खल्या जाणाऱ्या किल्ल्यावर यशस्वी चढाई करुन आपले पाय रोवले. या मोहिमे मध्ये कार्यरत असलेले प्रचितीचे वडील प्रदीप घरत आणि चित्रा प्रदीप घरत या दांपत्याचेही मोठे सहकार्य लाभल्याचे समुहाकडून सांगण्यात आले. या मोहिमेत सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर समुहाचे पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, अक्षय जमदरे, भुषण पवार यांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रचिती घरत या चिमुकलीसह एका नव्या विक्रमाची नोंद सह्याद्री अॅडव्हेंचर च्या नावे करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.

Post a Comment

0 Comments