रुग्णांना मृत्यूच्या जबड्यातून ओढणाऱ्या अवलियांचा न्याय मंदिरात सन्मान
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोना महामारीच्या काळात ज्यांना तहान-भूक मिटवण्याचीही उसंत नव्हती. हवा लागायला मार्ग नसलेले नखशिखांत पीपीइ कीटमध्ये लपेटलेले संपूर्ण शरीर ओलेचिंब झालेले, अशाही अवस्थेत कल्याणसह भिवंडीतील अनेक हॉस्पिटलमध्ये जाऊन अनेक अत्यवस्थ कोरोनाग्रस्त रुग्णांची तपासणी आणि औषधोपचार करणाऱ्या, अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या अवलिया महायोद्ध्यांचा कल्याणच्या न्यायमंदिरात गौरव करण्यात आला.

 


          या सन्मानाचे डॉ. मुदस्सर पोकर यांच्यासह 5 डॉक्टर मानकरी ठरले. कल्याण-भिवंडीतील शेकडो रुग्णांचे प्राण वाचविताना डॉ. मुदस्सर पोकर यांना जणू तारेवरची कसरत करावी लागत होती. कोणत्याही परिस्थितीला न डगमगता डॉ. मुदस्सर पोकर यांनी आपले काम अव्याहतपणे चालू ठेवले होते. याच काळात अनेक वकील मंडळी कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी जिवावर उदार होऊन कल्याण न्यायालयामध्ये येत असत.          त्यातच अनेक वकिलांना कोरोनाची लागण झाली. जेवढे कोरोना बाधित वकील जीवन-मरणाचा संघर्ष करत होते त्या सर्वांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचे काम डॉ. पोकर यांनी केले आहे. तर कोरोनाग्रस्तांसाठी अहोरात्र कार्य करणारे डॉ. अभय गायकवाड यांच्याही मदतीला धावणारे डॉ. पोकर होते. अशा या डॉक्टर वजा महायोद्ध्यांचा महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे अध्यक्ष गजानन चव्हाण यांच्या हस्ते आणि कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजीव पांडे यांच्या हस्ते आणि न्यायाधीश के. डी. जाधव, न्यायाधीश व्ही. एस. मालकापट्टी रेड्डी, न्यायाधीश एस. आर. पहाडी यांच्या उपस्थितीत गौरव सोहळा कल्याण जिल्हा दिवाणी न्यायालय संघटनेने आयोजित केला होता.           याचवेळी डॉ. अमित बोटकोंडले, डॉ. गौतम गणवीर आणि इंडियन मेडीकल असोसिएशनच्या कल्याण विभागाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनाही गौरविण्यात आले. कोरोना काळात अनेक वकील बांधवांना हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध करून औषधोपचार वेळेवर व्हावेत याकरिता प्रशासनासह डॉक्टरांशी वारंवार फोन करून संपर्कात असणारे व या काळात अर्ध्यारात्री देखील वकिलांना सहकार्य करणारे न्यायाधीश अब्दुसलाम अशपाक अहमद शेख यांनाही याप्रसंगी कोरोनायोद्धा म्हणून गौरविण्यात आले.    तर मागील दीड वर्षांपासून कल्याण न्यायालयाचा परिसर, न्यायदान कक्ष, बाररूमची काळजी घेणाऱ्या केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांसह नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांना कोरोनायोद्धा म्हणून गौरव करण्यात आले. तर कल्याण दिवाणी वकील संघटनेचे अॅड. गणेश धारगळकर यांची डीएनसी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.           कल्याण जिल्हा दिवाणी वकील संघटनेने अत्यंत सूत्रबद्ध कार्यक्रमाचे नियोजन केले होते. संघटनेचे अध्यक्ष सतीश अत्रे आणि त्यांच्या टीमने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याचे कल्याण फौजदारी वकील संघटनेचे सहसचिव ॲड. प्रकाश जगताप यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments