कल्याण शीळ रस्त्याच्या अर्धवट कामामुळे कारचा भीषण अपघात चालक गंभीर जखमी, गाडीचा चुराडा

 कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : कल्याण शीळ रस्त्याचे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे आज एका चारचाकी गाडीला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. गाडी दूरवर फेकली गेली आहे. गाडीचा चालक सुदैवाने बचावला असला तरी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात चारचाकी गाडीचा चुराडा झाला आहे. या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. या नव्या भीषण अपघाताच्या घटनेमुळे रस्त्याच्या अर्धवट कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.गाडी चालक आकाश पाटील हा आज पहाटे शीळहून कल्याणच्या दिशेने जात होता. या दरम्यान पांडुरंगवाडी नजीक रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्याठिकाणी कंत्रटदाराने एक लोखंडी डिव्हायडर पत्रा लावला आहे. हा लोखंडी पत्रा लक्षात न आल्याने पाटील यांची गाडी त्याला जोराने धडकून रस्त्याच्या गटारीत जाऊन उलटी पडली. अपघाताचा मोठा आवाज ऐकून आसपास राहणाऱ्या लोकांनी रस्त्यावर धाव घेतली. घटनास्थळी असलेल्या काहींनी गाडीतून आकाशला बाहेर काढले. त्यानंतर त्याला रुग्णालयात पाठविले. ही घटना पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट आहे. कंत्राटदाराकडून अर्धवट कामाच्या ठिकाणी कोणत्याही सूचना नाही. तसेच रेडीयम पट्टी लावलेली नाही. या ठिकाणी वारंवार अपघात होतात. त्याकडे राज्य रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष आहे. घटना घडल्यावर त्याठिकाणी कंत्रटदाराने त्याचे कामगार पाठविले. त्यानंतर दिवसभर कामगार अर्धवट कामाच्या ठिकाणी उघड्या असलेल्या लोखंडी गज वाकविण्याचे काम करीत होते. तसेच शेजारी असलेले कल्वर्टचा खड्डा जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून बुजविला गेला.

Post a Comment

0 Comments