स्थलांतरीतांची आई हिराबाई जगताप यांचे निधन

 ठाणे (प्रतिनिधी)  - शिक्षण आणि रोजगाराच्या निमित्ताने गाव सोडून मुंबईत आलेल्या तरुणांना हक्काचा निवारा उपलब्ध करुन देणार्‍या हिराबाई आप्पासाहेब जगताप यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 98 वर्षांच्या होत्या. कळवा-खारीगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जगताप यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नात असा परिवार आहे.          हिराबाई जगताप या आपले पती आप्पासाहेब यांच्या सोबत अर्थार्जनासाठी मुंबत आल्या. त्यावेळी त्यांना आलेल्या अडचणी इतरांना येऊ नयेत, या उद्देशाने त्यांनी आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही डिलाईल रोड भागात अन्नछत्रच सुरु केले होते. ग्रामीण भागातून शिक्षण आणि रोजगारासाठी आलेल्यांना हिराबाई यांनी हक्काचा निवारा आणि दोनवेळचे जेवण देण्याचा उपक्रम 1980 च्या दशकात सुरु केला होता. त्याशिवाय, परिसरात रुग्णसेवेचा वसाही त्यांनी उचलला होता.             सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील आपल्या मूळगावी सामूहिक शेतीचा उपक्रम राबविला होता. गावातील महिलांना एकत्र करुन त्या एकमेकांच्या शेतीवर जाऊन एकत्रित कामे करुन घेत होत्या. त्यामुळे शेतकर्‍यांना मजुरीपोटी सहन करावी लागणारी आर्थिक झळही सोसावी लागत नव्हती.             रविवारी त्यांचे खारीगाव येथील केशव हाईट्स या त्यांच्या निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी  येत्या 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Post a Comment

0 Comments