उद्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष मोहिम; जिल्ह्यात गावस्तरावर सुक्ष्म कृती आराखडा तयार करावा


■दुर्गम, डोंगराळ ४८ गावांमध्ये ‘व्हॅक्सीनेशन ऑल व्हील’ अंतर्गत लसीकरण - जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर...


ठाणे, दि.७ (जिमाका):  राज्यात उद्या दि. ८ ऑक्टोबरपासून ते १४ ऑक्टोबर या कालावधीत १ कोटी नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असून त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणेनेसह शिक्षण, बालविकास, गटविकास अधिकाऱ्यांनी गावस्तरावर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा सुक्ष्म कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणाची गती वाढवावी यासाठी अतिदुर्गम, डोंगराळ अशा ४८ गावांमध्ये ‘व्हॅक्सीनेशन ऑल व्हील’ अंतर्गत लसीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.            जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत झालेल्या कोरोना लसीकरण कृती दलाच्या आढावा बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी तर दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण आणि महापालिका, नगरपालिका यांचे वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी, तहसीलदार,गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यावेळी उपस्थित होते.         जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर म्हणाले, राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यात ८ ते १४ ऑक्टोबर २०२१ याआठवड्यात १ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याकरीता विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.          सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्याची प्रथम आणि व्दितीय डोस घेतलेल्यांची टक्केवारी राज्याच्या टक्केवारी नुसार आहे. तथापी, लाभार्थ्यांच्या एकुण संख्येचा विचार करता जवळपास २८ लाख नागरिकांनी अद्याप प्रथम डोस घेतलेला नाही. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे त्वरित लसीकरण करण्यासाठी तालुकास्तरीय सुक्ष्मनियोजन करून उद्यापासुन प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरूवात करा, असे श्री. नार्वेकर यांनी सांगितले.


 

          या विशेष लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्याकरीता गावस्तरावर कोविड लसीकरणाचा सुक्ष्म कृती आराखडा करून ग्रामिण भागात लसीकरण वाढविण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. अतिदुर्गम आदिवासी व डोंगराळ भागात मोबाईल मेडिकल युनिट व जिल्हा परिषद वाहनांमार्फत अंदाजे ४८ गावांमध्ये ‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हील’ अंतर्गत लसीकरण करण्यात येणार आहे.        गावस्तरावर लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्याकरीता तालुकास्तरीय कोविड लसीकरण कार्यबल समिती सभेचे आयोजन करुन सुक्ष्म कृती आराखडा त्वरीत करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. गावस्तरावर लसीकरण सत्र आयोजित करण्याची परवानगी तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.         ही मोहिम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरावरील सर्व विभागांनी सहभाग देवून नागरिकांचे कोविड लसीकरणासाठी समुपदेशन करावे. सर्व महानगरपालीका, तालुके व नगरपालीकांना दैनंदिन लसीकरणाचे लक्षांक देण्यात आले असुन त्यानुसार लसीकरण सत्रे आयोजित करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.         राज्यात १ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचा संकल्प असल्याने ठाणे जिल्ह्याला देण्यात आलेले लसीकरणाचे लक्षांक पुर्ण करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments