भिवंडी मनपाचे दुर्लक्ष ; शिक्षक सोसायटीच्या प्रवेश द्वारावर तुंबले गटाराचे पाणी, दुर्गंधीने रहिवासी हैराण

भिवंडी दि. ६ (प्रतिनिधी  ) शहरातील  ताडाळी येथील शिक्षक वसाहत म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिक्षक सोसायटीच्या मुख्य प्रवेश द्वारावर मनपाच्या दुर्लक्षित कारभारामुळे गटाराचे पाणी तुंबले आहे. विशेष म्हणजे या शिक्षक सोसायटीच्या बाजूला असलेल्या मुख्य गटाराच्या सफाईकडे मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे गटार तुंबले आहे. 
          त्यामुळे आजूबाजूच्या रहिवासी इमारतींचे सांडपाणी तसेच मलनिस्सरनाचे दुर्गंधीयुक्त दूषित पाणी देखील या शिक्षक सोसायटीच्या मुख्य प्रवेश द्वारावर अडलेजात असल्याने शिक्षक सोसायटीच्या प्रवेश द्वारावर घाणीचे व गटाराचे साम्राज्य पसरले असल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून येथील रहिवासी नागरिक व शिक्षकांना घरी येता जातांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.               विशेष म्हणजे या ठिकाणी एका बांधकाम व्यावसायिकाने या शिक्षक सोसायटीच्या बाजूला नव्या बांधकामासाठी दगड व माती भराव केला असल्याने पावसाळ्यात हि माती गटारात गेल्याने येथील गटार तुंबले आहे. शिक्षक सोसायटीच्या रहिवाशांनी मनपा प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार केला असतांनाही मनपा प्रशासनाने शिक्षकांच्या या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केला असून शिक्षकांना मागील पाच महिन्यांपासून प्रवेशद्वारावर येता जातांना नाक मुठीत धरून दबकत दबकत आपल्या घरात प्रवेश करण्याची नामुष्की ओढवली आहे. 
             तर कधीकधी बाहेर जातांना इमारतीच्या प्रवेशद्वारावर साचलेले गटाराचे पाणी अंगावर उडाल्याच्याही घटना अनेक रहिवासींसोबत घडल्या आहेत. दरम्यान लेखी पत्रव्यवहार व निवेदने देऊन तसेच मनपाची सर्व कर वेळेवर भरूनही आम्हाला मनपा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अशा नरक यातना सहन कराव्या लागत आहेत हे आमचे दुर्दैव आहे अशी संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवासी सुमित जाधव यांनी दिली आहे. 

Post a Comment

0 Comments